खेड:- खेड शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार शुक्रवारी रात्री खेड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. अज्ञाताने दोघींना आमिष दाखवून अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या बाबत एका मुलाच्या वडिलांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
एका मुलीचे वय 16, तर दुसऱ्या मुलीचे वय 13 आहे. या दोघी शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होत्या. शुक्रवारी बारावा पेपर असल्याने त्यांची शाळा 10 वाजता सुटणार होती. मात्र 12 वाजून 30 मिनिटे होवून देखील त्या घरी न परतल्याने एकमेकांच्या आई-वडिलांनी मोबाईलवर संपर्क साधत विचारणा केली असता आल्या नसल्याचे सांगितले. त्यानंतर बाजारपेठेसह रेल्वेस्थानक, बसस्थानक, भरणे, खवटी व आजूबाजाच्या परिसरात शोध घेवूनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिरा अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली.