रत्नागिरी:- खेड तालुक्यात नदीपात्राजवळ सापडलेल्या व्यक्तीची तुटलेली बोटे आणि मांसाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या 24 तासात पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला आहे. खेडमधील सुसेरी गावात सोन्याच्या दागिन्यांसाठी 64 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली.
पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावत, या प्रकरणी गावातील चार तरुणांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. बाळकृष्ण भागोजी करबटे (वय 65) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वयम शिंदे (21) अजय शिंदे (24), राजेश पाणकर (37), निलेश पाणकर (34) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. बाळकृष्ण करबटे हे शनिवारी गावात फिरत असताना आरोपींनी त्यांना जंगलाच्या दिशेने नेत त्यांची हत्या केली. शनिवारी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच सुरु होती. गावातले सर्व लोक मॅच पाहण्यात दंग होते. यावेळी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास बाळकृष्ण करबटे हे कचरा टाकण्यासाठी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या ओढ्याजवळ गेले. ओढ्यापासून काही अंतरावर जगबुडी नदीकडे जाणारा रस्ता आहे. तेथे काहीतरी कारण सांगत तरुणांनी त्यांना जंगलमय भागात नेले आणि त्यांना मारहाण करीत अंगावरचे सोन्याचे दागिने चोरले. तसेच हातातली अंगठी निघत नाही म्हणून चक्क कोयत्याने त्यांची बोट तोडली आणि सोन्याची अंगठी चोरली. त्यानंतर त्यांचा मृतदेह जगबुडी नदीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी करबटे बेपत्ता झाल्याने गावातील लोकांनी शोध सुरू केली असता नदीकिनारी त्यांना तुटलेले बोट, एक बॅटरी आणि मांसाचा एक तुकडा आढळला. त्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी आरोपींचा कसून तपास सुरू केला. श्वान पथक मागवण्यात आले. फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढत एकएक आरोपीच्या मुसक्या आवळल्या.