रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर सोमवारी सकाळी ओसरला असून अधुनमधून सरी पडत आहेत. मात्र सोमवारी सायंकाळ नंतर पुन्हा पावसाच्या ढगांनी गर्दी करत हजेरी लावली. रत्नागिरीत दुपारी कडकडीत उन पडले होते. खेड, चिपळूण, राजापूर येथील पूर ओसरला असून जनजीवन पुर्वपदावर आले आहे. जिल्ह्यात भात लागवडीला वेग आला असून आतापर्यंत 42 हजार 131 हेक्टरवर भात लावण्या पुर्ण झाल्या आहेत. आठवडाभरात दहा हजार हेक्टरवर लावण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
सोमवारी (ता. 24) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात गुहागर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक 78 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी 63.44 मि.मी. पाऊस झाला. मंडणगड 71, दापोली 68, खेड 37, गुहागर 78, चिपळूण 78, संगमेश्वर 78, रत्नागिरी 31, लांजा 60, राजापूर 70 मिमीची नोंद झाली. पावसाचा जोर ओसरल्यामुळे राजापूर तालुक्यातील कोदवली नदीची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पूर ओरसला असून बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत झाले आहेत. पाऊस कमी झाल्यामुळे भात रोपं लावण्यांना वेग आला आहे. आठ दिवसांपुर्वी जिल्ह्यात 50 टक्के भात रोपांची लागवड पूर्ण झाली होती. सोमवारी (ता. 24) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 60 टक्केहून अधिक लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्याचे एकुण क्षेत्र 68 हजार हेक्टर आहे. त्यातील सुमारे 42 हजार हेक्टरवरील लावण्या पूर्ण झाल्या आहेत. उशिरा पेरण्या केलेली रोप लावणीसाठी आता तयार झाली आहेत. अति पावसामुळे खेड, दापोली, मंडणगडसह राजापूरमधील शेतीची कामे थांबली होती. ती पुन्हा सुरु झाली आहेत. अन्य तालुक्यांच्या तुलनेत रत्नागिरीत पावसाचा जोर कमी असल्याने लावण्यांची कामे ९० टक्के झाली आहेत. तालूक्यात एकुण ६,८३३ हेक्टर भात क्षेत्र असून आतापर्यंत ६,१३० हेक्टरवरील लावण्या झाल्या आहेत. कातळ परिसरातील शेतीची कामे लवकर आटोपली आहेत.