खेड:- खेड तालुक्यातील कोंडीवली बौध्द वाडी येथील जुन्या स्मशानभूमीत शासकिय जागेत असलेले गावठाण हा भूखंड शासनाने बळकावून त्यावर अतिक्रमण केले आहे. ही जागा ग्रामस्थांना परत मिळावी या करिता बहूजन पार्टी व ग्रामस्थानी दोन वेळा आंदोलन करून देखील त्यांच्या पदरी निराशा पडली असून आता त्यांच्यावर कोकण रेल्वेने प्रशासनांने देखील अतिक्रमण केले असल्याचे पत्र धाडले आहे. या ग्रामस्थाना आता स्वमालकीची जागा उरली नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. आमची जागा परत करा नाहीतर आंदोलन पुकारु असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
गेली १० वर्षा हुन अधिक काळ हा वाद सुरू आहे. मात्र या बाबत स्थानिक प्रशासन कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर बसपा च्या कार्यकर्त्या समवेत ४ जानेवारी २०२१ रोजी कोंडीवली येथे उपोषण छेडले गेले. त्या उपोषणाची दखल न घेतली गेल्याने प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडले गेले. त्यावेळी झालेले अतिक्रमण ५ दिवसात हटवले जाण्याचे लेखी पत्र देण्यात आले मात्र ५ महिने उलटून देखील कोणतीच कार्यवाही न झाल्याने पुन्हा १८ मे रोजी उपोषण छेडले गेले. त्यावेळी थेट तहसील कार्यालयात चर्चा झाली मात्र त्यांच्या नशिबी निराशाच पडली असल्याची माहिती बसपाचे कार्यकर्ते प्रदीप कांबळे यांनी दिली.
या प्रकरणात गावठाण अर्थात शासकीय भूखंड असलेल्या जागा बळकावून त्यांचे सातबारा तयार करून त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. गावठाण क्षेत्रात कायद्याने सातबारा तयार करता येत नाहीत मात्र या गावात मनमानी करून कायदा धाब्यावर बसवण्यात आला असल्याची ग्रामस्थ प्रशासनाला पोट तिडकीने सांगत आहेत. मात्र त्यांच्या या मागणी कडे डोळेझाक केली जात असल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे.
गट क्र ५४९ मध्ये अतिक्रमण झाले हे प्रशासन मान्य करत आहेत, मात्र त्या पैकी १०४ हा गट क्रमांक सापडत नसल्याचे कारण देत वेळ मारून नेली जात आहे तर अन्य गटात देखील अतिक्रमण झाले असल्याची बाब मांडत असताना ग्रामस्थ हे मूळ मालक असताना त्यांना मालक न दाखवता अन्य अतिक्रमण केलेल्या दोघांना मालक दाखवून अजब प्रकार समोर येत आहे.
दरम्यान १८ मे रोजी छेडले गेलेले उपोषणानंतर स्थानिक पातळीवर प्रशासन कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. शासकीय अभिलेख व कागदपत्रांसाठी फेऱ्या माराव्या लागत आहे. तर कार्यवाही करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. अतिक्रमण करणाऱ्याना पाठीशी घालून ग्रामस्थांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे आम्हाला उचित न्याय द्या अशीच मागणी बसपाचे प्रदिप कांबळे यांनी केली आहे.