खेडमध्ये एकाच वाडीतील चार लहान मुले कोरोनाच्या विळख्यात

खेड:- संपुर्ण राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका कायम असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र तिसऱ्या लाटेस सुरवात झाल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. खेड तालुक्यातील सुसेरी गावात ४ लहान मुले कोरोना बाधित झाल्याचा प्रकार घडला आहे. तालुक्यातील कोरेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या हद्दीत येणाऱ्या सुसेरी नं. १ या गावातील एका वाडीतील ४ लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला आहे.

सुसेरी नं. १ येथील एका कुटुंबातील पती -पत्नी हे कोरोना बाधित सापडल्याने त्यांच्या मुलांची ही आरोग्य विभागाने कोरोना तपासणी केली. यावेळी या कुटूंबातील चार लहान मुले कोरोना बाधित सापडले. यामध्ये एक २ वर्षाची मुलगी असून उर्वरीत मुले आहेत. या चार ही मुलांना प्रशासनाने खेड शहरातील शिवतेज कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना कोरेगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. नितीन मोरे यांनी ही तिसऱ्या लाटेची सुरवात असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.  या चार ही लहान मुलांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डेल्टा प्लसच्या अनुषंगाने या चार मुलांची पुढील तपासणी आरोग्य विभाग करणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.

कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावामध्ये सध्या ६६ रूग्ण कोरोनाबाधित असून त्यातील २५ रूग्ण होम होमआयसोलेशनमध्ये असून उर्वरीत ३५ रूग्ण हे संस्थात्मक विलीनीकरण आहेत. तर गेल्या मार्च महिन्यापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आरोग्य केंद्रात अंतर्गत ३५०६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

ही मुले बाधित झाली याचा अर्थ लगेच जिल्ह्यात तिसरी लाट आली असे म्हणता येणार नाही. घरातील आई,वडील बाधित झाल्यामुळे ही मुले बाधित झाली आहेत. त्याना कोरोना ची खुपच सौम्य लक्षणे होती.आता ही मुले उपचारा नंतर त्यांची तब्येत चांगली आहे. कोरेगाव चे डॉ.मोरे यानी भावनेच्या भरात तिसरी लाट आली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे ती पूर्णत: चुकीची आहे. नागरीकानी घाबरुन जाऊ नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण पाटील यानी सांगितले.