खेडमधील शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

खेड:- खेड तालुक्यातील कुळयेवाशी येथे बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला चढवला. बिबट्या पासून सुटका करून घेत झाडावर चढत बिबट्याने स्वतः चे रक्षण केले. मोबाइलद्वारे गावातील ग्रामस्थांशी मदत मागितली आणि स्वतः चा जीव वाचवला. ग्रामस्थ आल्याने बिबट्या पळून गेला. 

आत्माराम गावडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गावात भात शेती तयार झाली आहे. यातच पाऊस पडत असल्याने शेतीची कापणी रखडली आहे. शेतीची वन्यप्राण्यांकडून नासधूस होऊ नये, यासाठी शेतकरी रात्रभर राखण करत असतात. 

आत्माराम गावडे हे ‘गंगेचे तळे’ या ठिकाणी असलेल्या भातशेतीची राखण करण्यासाठी शुक्रवारी रात्री ८ वा.च्या सुमारास गेले. शेतीच्या कडेला जाऊन उभे राहिले. यावेळी ते नेहमीप्रमाणे बॅटरी मारून परिसरात पाहणी करत होते. बॅटरी सर्व बाजूने फिरवत असताना बॅटरीचा फोकस जवळच असलेल्या बिबट्यावर पडला अन् गावडे घाबरले. त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या त्यांच्याच बाजूने पुढे येऊ लागला. यावर गावडे यांनी ऐनाच्या झाडाचा आधार घेतला. घाबरलेल्या स्थितीत झाडावर चढताना ते एकदा खाली पडले. तरीही जीवाच्या आकांताने ओरडत ते झाडावर चढून बसले. बिबट्याही झाडापाशी आला. गावडे पुरते घाबरले होते. त्यांनी मोबाईलवरून गावकऱ्यांना सांगून ताबडतोब ‘मला वाचवायला या’ असे सांगितले. 

यावर १० ते १२ ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने बॅटऱ्या घेऊन धावले. त्यांना पाहून बिबट्याने पळ काढला. त्यानंतर गावडे झाडावरून घाबरलेल्या स्थितीत उतरले. जीव वाचल्यामुळे ग्रामस्थांचे आभार मानून घरी परतले. ग्रामस्थ वेळेवर पोहोचल्यामुळे अनर्थ टळला, अशी भावना गावडे यांनी व्यक्त केली.

या परिसरात अजूनही बिबटे फिरत आहेत. सोमवारी रात्री ८ वा. च्या सुमारास मंगेश भेकरे यांच्या अंगणातील मांजरांवर झडप घालण्यासाठी बिबट्या आला. यावेळी त्यांच्या पत्नीने त्याला पाहताच आरडाओरड केली. जंगलात दर्शन देणारा बिबट्या मनुष्यवस्तीत आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी  ग्रामस्थ करत आहेत.