खून करून 27 वर्षे फरार आरोपीस उत्तरप्रदेशमधून अटक

खेड:- तालुक्यातील लोटे येथे एका कामगाराचा खून करून तब्बल 27 वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मारेकऱ्यास खेड पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून जेरबंद केले. सुरेशचंद्र रामखिलोन खितवास (50) असे ताब्यात घेतलेल्या फरारीचे नाव आहे.

मारेकरी व मृत कामगार लोटे येथील एका कंपनीत कामाला होते. रागाच्या भरात त्याने सखाराम मांजरेकर याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करून पलायन केले होते. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मारेकरी अनेक वर्षे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. हा मारेकरी उत्तरप्रदेशमधील छिपी पुरिईन येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस पथक तयार करण्यात आले. अखेर पथकाने उत्तरप्रदेशमधून त्याला गजाआड केले.