खून करून नेपाळी तरुणाचा मृतदेह मिरकरवाडा जेटीत फेकला?

रत्नागिरी:- शनिवारी सकाळी मिरकरवाडा जेटी येथील पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून या तरुणाचा पाण्यात पडण्यापूर्वी मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. तरुणाच्या डोक्यात आणि छातीजवळ जखमा आढळल्या असून या खुनाचा उलगडा करण्याचे आव्हान शहर पोलिसांपुढे आहे. 
 

या तरुणाची ओळख पटली असून तो नेपाळी आहे. त्याचा खून करण्यात आल्याच्या संशयातून त्याच्या भावाने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सुनिल जितलाल चौधरी (मुळ रा. नेपाळ सध्या रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ प्रकाश जितलाल चौधरी (22, मुळ रा.नेपाळ सध्या रा.लांजा) याने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार,सुनिल हा शुक्रवारी मध्यरात्री 2 वा.सुमारास गावातील काही लोकांसोबत हनिफ वस्ता यांच्या बोटीवर काम करत असताना शौचालयाला गेला होता.त्यानंतर शनिवारी सकाळी 9.15 वा.सुमारास त्याचा मृतदेह मिरकरवाडा जेटीजवळ पाण्यावर तरंगताना मिळून आला होता.उत्तरीय तपासणीत सुनिलच्या कपाळावर आणि छातीवर जखमा झालेल्या असून त्या मृत्यूपूर्वीच्या असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अज्ञातांनी सुनिलला कोणत्यातरी वस्तू किंवा हत्याराने मारुन त्याचा मृतदेह पाण्यात टाकला असल्याच्या संशयातून भाऊ प्रकाशने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.