खासदार राऊत यांनी संपर्क कार्यालय आठवडा बाजार येथे हलवले

रत्नागिरी:- मुख्यमंत्र्यांच्या गटातील शिवसेना आमदार उदय सामंत यांच्यावर खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. खासदारांचे मारुती मंदिर येथील संपर्क कार्यालय  शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या आठवडा बाजार येथील कार्यालयात स्थलांतरीत केले जात आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार असलेल्या विनायक राऊत यांना रत्नागिरी विधानसभा मतदार संघाने चांगले मताधिक्क्य मिळवून दिले. त्यामुळे या दोन्ही आमदार, खासदारांचे फारच घट्ट नाते निर्माण झाले. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर दोघांमध्ये राजकीय कुरबुरी सुरु झाली. यातून धूसफूस सुरु होती पण ती जाहीरपणे व्यक्त होत नव्हती.

शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे असे दोन गट समोरासमोर उभे ठाकले. याच पार्श्वभूमीवर नुकताच मुळ शिवसेनेचा मेळावा झाला. यावेळी खा. राऊत यांनी आ. सामंत यांना ‘उपरा’ असे संबोधले. त्यांनी केलेल्या भाषणातील राग हा मागच्या पुढच्या संतापाचा परिणाम पूर्णपणे जाणवत होता. परंतु मेळाव्यातील आरोप- प्रत्यारोपानंतर खासदारांनी ते संपर्क कार्यालय तेथून हलवण्याचा निर्णय घेतला आहे.  सेनेचे उपनेते राजन साळवी यांच्या आठवडाबाजार येथील कार्यालयात खासदारांचे कार्यालय लवकरच कार्यान्वित होणार आहे.

खासदारांना रत्नागिरी दौरे वाढवावे लागणार
रत्नागिरी जिल्ह्यातून आमदार उदय सामंत यांना मोठा जनाधार आहे. या जनाधाराच्या विश्वासावर खा. विनायक राऊत आतापर्यंत निश्चिंत होते. परंतु आता अचानक घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे त्यांच्या लोकसभा मतदार संघात येणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांमधल्या मतदारांशी  संपर्क वाढवावा लागणार आहे. निवडणुकीला दोन वर्ष शिल्लक असून या कालावधीत मतदारांच्या कामासाठी सतत रत्नागिरीत येऊन संपर्क ठेवावा लागणार आहे.