खालगावात हापूस कलमांना आग; लाखोंचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

रत्नागिरी:- तालुक्यातील खालगाव येथे बुधवारी आंबा बागेला अचानक आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज असून आगीत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

या आगीत किसन घाणेकर यांची १५ काजूची झाडे जळून खाक झाली. ऐन हापूस आंबा आणि काजूच्या हंगामामध्ये ही आग लागल्यामुळे घाणेकर यांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये त्यांचे सुमारे २१ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीमुळे आजुबाजूला असलेले बागायतदार गणपत धामणे, शिवराम धामणे, यशवंत गोधळी या शेतकऱ्यांनाही आगीची झळ बसून त्यांचेही नुकसान झाले आहे. हापूस आंबा कलमांवर कैरी धरली होती. ती जळून गेली आहे. या घटनेची माहिती मिळताच खालगाव सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य उमा देसाई यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले; परंतु आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच कालावधी लागला.

आर्थिक मदत मिळावी

खालगाव येथील अचानक आंबा बागेत लागलेल्या आगीमुळे ऐन हंगामात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.