खलाशी, गुरख्यांच्या लसीकरणावर अधिक भर: जिल्हाधिकारी 

रत्नागिरी:- ख्रिसमस आणि नववर्षाच्या आगमनाचे कार्यक्रम साध्या पध्दतीने साजरे करावेत. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच मच्छीमारी नौकांवर आणि आंबा बागेत कामासाठी बाहेरुन येणार्‍या नेपाळी गुरख्यांचे लसीकरणासाठी प्राधान्याने कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख 1 हजार 588 नागरिकांनी पहिला तर 6 लाख 16 हजार 426 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्याप 80 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. हे नागरिक एकतर ग्रामीण भागात असावेत किंवा जिल्ह्याबाहेरही असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात बाहेरुनही नागरिक कामासाठी येत आहेत. मच्छीमारी नौकांवर व आंबा बागेमध्ये कामासाठी नेपाळी गुरखे दाखल झाले आहेत. त्यांचेही लसीकरण हाती घेण्यात आले आहेत. ग्रामीण भागात नव्याने लसीकरण शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. शहरी भागात लसीकरण मोहीम सुरु आहे. ग्रामीण भागामध्ये व्हॅक्सिन ऑन व्हीलच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या ख्रिसमस व नववर्ष स्वागताची तयारी अनेक ठिकाणी सुरु आहे. पर्यटकही मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे उत्साहात असताना नागरिकांनी निर्बंध पाळावेत, गर्दी करु नये, मास्क वापरावेत असे आवाहन त्यांनी केले. गर्दीच्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यास संक्रमण वेगात होऊ शकते. गेल्या दीड वर्षानंतर व्यवसाय, नोकरी यामुळे आर्थिक गाडी रुळावर येत आहे. पर्यटनातून व्यवसाय होत आहे. ही आर्थिक घडी बिघडू देऊ नका. त्यासाठी एकमेकांची काळजी घेऊन उत्सव साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड उपस्थित होत्या. जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरणाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.