रत्नागिरी:- चिपळुण येथील सह दुय्यम निबंधक श्रेणी 1 मधील प्रशांत धोत्रे (43, दस्त नोंदणी विभाग, चिपळूण) याला 7 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे धोत्रे याने 8 दिवसापूर्वीच कार्यभार हातात घेतला होता. तर त्याला मदत करणारा अरविंद बबन पडवेकर (56, मुरादपुर, चिपळूण) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदार 34 वर्षीय तरुण असून व्यवसायाने वकील आहे. प्रशांत धोत्रे याने त्यांच्याकडे खरेदीखत व हक्कसोड नोंदणी करता 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र चर्चेअंती 7 हजारावर तोडगा निघाला. 2 नोव्हेंबर रोजी धोत्रे याच्या सांगण्यावरून एका खासगी व्यक्तीकडे पैसे देण्याचे ठरले. दुय्यम निबंधक कार्यालय चिपळूण येथे लाचलुचपत विभागाने सापळा रचला. यावेळी 7 हजाराची लाच स्वीकारताना प्रशांत धोत्रे आणि एका खासगी इसमाला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक श्री. अनंत कांबळे, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, पोलिस नाईक दिपक आंबेकर, पोलिस शिपाई हेमंत पवार, चापोशी प्रशांत कांबळे यांनी केली.पर्यवेक्षक अधिकारी म्हणून श्री. सुशांत चव्हाण (पोलीस उप अधीक्षक, ACB रत्नागिरी) यांनी काम पाहिले.