रत्नागिरी:- कोकणात अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी संख्या ८५ टक्के आहेत. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी समूह शेतीला प्रोत्साहन द्यावे. तसेच खरिपासोबत रबी हंगामातही अधिक क्षेत्र पेरणी खाली येइल असे नियोजन करा, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिल्या. तसेच यंदा खरीप हंगामात ८२,७५४ हेक्टरवर भात लागवडीचे लक्ष्य कृषी विभागाने ठेवले आहे.
खरीप हंगाम २०२२-२३ च्या नियोजनाचा आढावा पालकमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. एक एकर किंवा त्याहून कमी शेती असणार्यांची संख्या कमी असल्याने शासनाच्या योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळत नाही. यासाठी समूह शेती महत्वाची ठरेल असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला खासदार विनायक राऊत, सर्व आमदार, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनंदा कर्हाडे उपस्थित होते. जिल्ह्यात लागवडी योग्य ३ लाख ९८ हजार ४०४ हेक्टर क्षेत्र असून ९१ हजार ९९२ हेक्टरवर खरिपाची लागवड होते. त्यापैकी ८० टक्के क्षेत्रावर भात तर १५ टक्के क्षेत्रावर नागली. इतर क्षेत्रात भाजीपाला व कडधान्य पिकवितात. यंदा ८२ हजार ७५४ हेक्टरवर भात लागवडीचे लक्ष्य आहे. शेतकर्यांना वेळेवर बियाणे, खत दिले जाणार असून साठेबाजीवर करडी नजर ठेवण्याच्या सुचना अॅड. परब यांनी दिल्या. गेल्या वर्षभरात 1966 हेक्टरने फळपिकाखाली क्षेत्र वाढले असून एकूण १ लाख ७५ हजार ३०५ हेक्टरची नोंद आहे. त्यात आंबा ६६,४३३ हेक्टर, काजू १,०२,४०० हेक्टर असून ५,२१२ हेक्टरवर नारळ आहे. भात पिकाचे सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी ३,२९४ किलो असून रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल आहे. खरीपासाठी ६,११४ क्विंटल बियाणे आणि १४,६४० मेट्रीक टन खताची गरज आहे. बियाणे विक्रीवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथक नेमण्यासह १० ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केली आहेत. सध्या नोंदणीकृत ३४६ विक्रेत्यांपैकी १९० विक्रेते पॉसचा वापर करतात. जिल्ह्यात ८०१ शेतकरी गट असून त्यांना बांधावर खत वाटपांतर्गत १२१ टनाचे वाटप केले जाणार आहे.