चिपळूण:- शहरात क्रिकेट खेळताना झालेल्या वादात एका मित्राने डोक्यात बॅट घातल्याने गंभीर जखमी झालेल्या लव्हकुमार वर्मा या १७ वर्षाच्या मुलाचा कराड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. चिपळूण पोलिसांकडून मारहाण करणार्या मुलाला अटक केली नसल्याने संतप्त झालेल्या त्याच्या आई-वडिलांसह नातेवाईक आणि समाजबांधवांनी लव्हकुमारच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती.
दरम्यान रात्री उशिरा येथे त्याचा मृतदेह आणल्यानंतर मोठी गर्दी जमली. चिपळूण पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी भेट देत पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लव्हकुमार वर्मा (१७, विद्यानगर सती) हा दि. ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्रांसमवेत सती परिसरातील भाग्योदय नगर येथे मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट खेळतेवेळी त्याचा व त्याच्या मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादाचा राग मनात धरुन त्याच्या दुसर्या एका मित्राने त्याच्या हातातील बॅट डोक्यात मारली. हा फटका इतका जोरात होता की यात लव्हकुमार हा गंभीररित्या जखमी होवून त्याची प्रकृती चिंताजनक बनली. त्यामुळे त्याला कराड येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाटी दाखल करण्यात आले होते.