क्रांतीनगर येथे जुन्या वादातून तरुणावर तलवारीचे वार; क्रांतीनगर रिक्षा स्टॉपनजिक घडला थरार

रत्नागिरी:-शहरातील क्रांतीनगर येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर तलवारीने सपासप पाच वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने रत्नागिरी शहरात खळबळ उडाली आहे.

हल्ला करणारे दोन तरूण घटनास्थळावरून पळून गेले तर गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र शिवाजी विटकर(वय 27 रा. क्रांतीनगर, मजगाव रोड) याला स्थानिक नागरिकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असून त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. मात्र भर रस्त्यात तलवारीने वार करणाऱ्या दोघांना पकडण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

शहरातील क्रांतीनगर मधील महालक्ष्मी मंदिरासमोर सोमवारी रात्री तीन तरुण दुचाकी जवळ उभे होते.हल्ल्यात गंभीर जखमी झालेला राजेंद्र विटकर व त्याचा मित्र गोट्या नाचणकर व त्याच्या समवेत एक तरुण असे तिघे उभे होते. राजेंद्र व गोट्या नाचणकर हे एकमेकांचे जुने मित्र आहेत, परंतु त्यांच्यामध्ये जुने वाद सुरु होते. सोमवारी रात्री क्रांतीनगर येथे राजेंद्र विटकर याच्या उभ्या असलेल्या दुचाकीवर लघुशंका केल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर गोट्या नाचणकर घटनास्थळावरून निघून गेला होता. परंतु तो परत धारदार तलवार घेऊन क्रांतीनगर येथे आला.त्याने मंदिरा समोर उभ्या असलेल्या राजेंद्र विटकर याच्या दोन्ही हातासह दोन्ही पायांवर धारदार तलवारीने सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात राजेंद्र विटकर हा रक्ताच्या थारोळ्यात तेथेच कोसळला. त्यानंतर हल्ला करणारे दोघेही तरुण घटनास्थळावरून पळून गेले.

राजेंद्र विटकर हा रक्ताच्या थारोळ्यात आरडाओरडा करत होता. यावेळी तेथील एका रिक्षा व्यवसायिकाने राजेंद्रला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजेंद्रवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कोल्हापूर ते हलविण्याचा सल्ला दिला. रात्री उशिरा त्याला कोल्हापूर येथे हलविण्याची प्रक्रिया सुरू होती.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावरचे नमुने, पंचनामा करण्याचे काम शहर पोलीस परत होते.तर गोट्या नाचणकर याच्यासह त्याच्या सहकार्याचा शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती रात्री उशिरापर्यंत नाचणकर चा शोध सुरू होता.