रत्नागिरी:- कोरोना लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत असली तरीही लशींचा तुटवड्याची अडचण कायम आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस घेणार्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात प्रशासनाला यश आले; मात्र कोव्हॅक्सीनच्या दुसर्या डोससाठी 15 हजाराहून अधिक लाभार्थी लस उपलब्ध नसल्याने प्रतिक्षेत आहेत.
जिल्ह्याची लोकसंख्या 16 लाख असून त्यापैकी 1 लाख 90 हजार लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस 54 हजार लोकांना देण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक कोविशिल्डची लस घेणारे आहेत. शासनाने सुरवातीला 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 18 ते 45 वर्ष वयोगटातील लोकांना संधी दिली. त्यामुळे लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली. गोंधळ टाळण्यासाठी 45 वर्षांवरील आणि फ्रंट लाईन योध्दे यांनाच प्राधान्य दिले जाऊ लागले. यामुळे काही अंशी गोंधळ नियंत्रणात येऊ लागला आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसर्या डोससाठीचा कालावधी 45 दिवसापर्यंत पुढे गेला आहे; मात्र कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर 28 दिवसांचे असल्यामुळे जिल्ह्यात गोंधळ उडत आहे. सध्या कोव्हॅक्सिनची लस कमी मिळत आहे. परिणामी दुसरा डोस घेणार्यांची संख्या 15 हजाराहून अधिक आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे गुरुवारी (ता. 27) कोविशिल्डचे 13 हजार 500 आणि कोव्हॅक्सीनचे 2 हजार डोस मिळाले आहेत. त्याचे प्रत्येक केंद्रांवर वितरण होणार आहे. कोव्हॅक्सीनचे डोस कमी असल्यामुळे पुन्हा केंद्रावर गोंधळ उडण्याची शक्यता आहे.