विभागीय आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना
रत्नागिरी:- कोरोना विषाणूच्या ‘ओमायक्रॉन’ या उत्परिवर्तीत विषाणूला अटकाव करण्यासाठी कोकणातील यंत्रणांनी दक्ष रहावे. विषाणू ओळखणारे चाचणी किट्स मिळण्याबाबत पाठपुरावा करावा आणि कोविड सेंटर पुन्हा सुरु करावीत, असे निर्देश कोंकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिले.
तसेच परदेशातून कोकणात मोठयाप्रमाणात पर्यटक येतात त्यांच्या कोविड चाचण्यांबाबत विशेष नियोजन करावे, अशा सुचना आयुक्तांनी दिल्या.कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तीत विषाणूमुळे येणार्या संभाव्य तिसर्या लाटेला अटकाव करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त श्री. पाटील यांनी विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी संभाव्य लाटेच्या तयारीचा आढावा घेतला व पुढील काळात राबवावयाच्या उपाययोजनांबद्दल सूचना केल्या.
कोकण भवन येथे आयोजित या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांच्यासह सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे येथील जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तीत विषाणूचा धोका राज्यात येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर कोकण विभागातील प्रशासनाने आतापासून तयारी करावी. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या लसीकरणाचे प्रमाण 100 टक्के करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी नवनवीन उपक्रम राबवावेत. लसीकरणाबाबत गावपातळीवर जनजागृती करावी. जिल्ह्यात लसींच्या पहिल्या व दुसर्या डोसचा तुटवडा होणार नाही, हे पहावे. विमानतळावरून येणार्या प्रवाशांवर विशेष लक्ष द्यावे. प्रवाशांच्या विलगीकरणासाठी नियोजन करावे. परदेशातून कोकणात मोठयाप्रमाणात पर्यटक येतात त्यांच्या कोविड चाचण्यांबाबत विशेष नियोजन करावे. कोवीड रुग्ण वाढून पुन्हा लॉकडाऊन लागू नये, या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे यासाठी पुन्हा जनजागृती करावी. मास्क न वापरणारे, नियम तोडून अनावश्यक गर्दी करणार्यांवर कडक कारवाई करा. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विभागातील ज्या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहेत. त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी नियोजन करा.