रत्नागिरी:- शिकवणी व्यतिरिक्तही ऑन फिल्ड काम करणार्या शिक्षकांनी दुसर्या लाटेमध्येही कोविड योद्धा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी 983 प्राथमिक शिक्षक काम करत असून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी शाबासकीची थाप दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य विभाग पुढे राहून काम करताना दिसत आहे. कोविड केंद्रांवर विविध कामांसाठी कर्मचारी अपुरे पडत आहे. पहिल्या लाटेवेळी तपासणी केंद्रांपासून कोरोना चाचणी केंद्रांपर्यंत विविध ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. कोरोनाची भयावह परिस्थिती असतानाही अनेक शिक्षकांनी सहकार्याची भूमिका बजावली. रात्री-अपरात्रीही नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून काम केले. दुसर्या लाटेमध्ये कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे मन लावून अनेक शिक्षक काम करताना दिसत आहेत. फ्रंटलाईनवर उतरुन काम करणार्या शिक्षकांची जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले. शिक्षकांसह जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचार्यांच्या नियुक्त्यांसाठी सीईओ डॉ. जाखड यांनी विशेष नियोजन केले होते. शिक्षण विभागाकडून केल्या जात असलेल्या कामांचे विशेष कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.