प्रतिकूल परिस्थितीवर मात; प्रकल्पाची शासनाकडून दखल
रत्नागिरी:- संसाराचा गाडा हाकताना रत्नागिरीतील तरुण दाम्पत्याने निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीतही उद्भवलेल्या संकटावर यशस्वी मात करत मागील दीड वर्षे गोड्या पाण्यातील कोळंबीचे संवर्धन यशस्वीरित्या केले आहे. उच्च शिक्षीत असलेल्या या दाम्पत्याने उभारलेल्या कोळंबी संवर्धन प्रकल्पाची दखल शासनानेही घेतली आहे.
तसे पाहिले तर कोळंबी ही समुद्रातील खार्या पाण्यात मोठ्या प्रमाणात सापडते. अनेकांनी खार्या पाण्याचे पाँड तयार करून त्यात कोळंबीचे संवर्धन करत उत्पन्नही घेतले आहे. मात्र, गोड्या पाण्यात कोळंबी संवर्धन करण्याचे आव्हान गौरव भोई आणि दर्शना भोई या रत्नागिरीतील तरुण उच्चशिक्षणीत जोडप्याने सहज पेलले. गौरव भोई हे स्वतः इंजिनिअर असून पत्नी दर्शना यांनी मत्स्य विद्यापिठातून पदवी घेतली आहे.
काही वर्षापूर्वी त्यांनी लाँच खरेदी करून मासेमारीचा व्यवसाय सुरू केला होता. नैसर्गिक संकट, मत्स्यदुष्काळ आणि बोटीवर काम करण्यासाठी कर्मचारी मिळत नसल्याने त्यांनी ही लाँच विकून अन्य व्यवसाय करण्याचे ठरवले. मत्स्य विद्यापीठातून पदवी घेतलेल्या दर्शना यांनी गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनाचा निर्णय घेतला. याला गौरव यांनी सर्व सहकार्य केले. सुरुवातीला जागा निवडण्यापासून प्लँट तयार करण्यापर्यंत त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले. पावस येथील नदीकिनारील जागा त्यांनी भाडेतत्वावर घेतली. या जागेत पीई शीटचा वापर करून दीड हजार, सहाशे आणि चारशे स्क्वेअर मीटरचे तीन प्लांट उभारले.
कोळंबीचे बीज पुरवणार्या अवंती कंपनीचे महेश शिंदे यांचे मार्गदर्शन घेतले. कोळंबी संवर्धनासाठी व्हेनामी प्रजातीची निवड केली. दि. 25 मे 2020 रोजी त्यांनी तामीळनाडूतून 36 तासांची सलग वाहतूक करत 60 हजार बीज आणले. 120 दिवसात प्रत्येक नग 30 ते 33 ग्रॅम वजनाचे झाले. पहिलीच बॅच यशस्वी झाल्यावर त्यांनी चार महिन्यांनी दुसरी 1 लाख पिलांची बॅच पाण्यात सोडली. याचीही वाढ यशस्वी झाली. आतापर्यंत त्यांनी चार बॅचचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. एक लाखातील 80 टक्के कोळंबी जगते. चार महिन्यात सरासरी उत्पादन 2.5 टन मिळते. किलोला 460 रुपये दर असून उत्पादन खर्च 200 रुपये आहे. एका बॅचमधून 11 लाख 50 हजार रुपये मिळतात. त्यात चाळीस टक्के नफा मिळू शकतो. स्थानिक बाजारापेठेसह निर्यातदार कंपन्या, आणि मुंबई, पुण्यातील ग्राहकांकडे कोळंबी पाठवली जाते.
दर्शना या प्लँटच्या देखरेखीसाठी दररोज 50 किलोमीटरचा प्रवास करतात. पाण्याचे तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, पिल्लांची वाढ, त्यांना देण्यात येणारे खाद्य यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. मासेमारीचा अनुभव असलेले गौरव तयार झालेले उत्पादन मार्केटमध्ये विक्री करतात. मध्यंतरी आलेल्या वादळांमुळे नुकसान होऊनही एकमेकांच्या चांगल्या समन्वयातून या तरूण दाम्पत्याने उभारलेला प्लांट ‘स्टार्टअप’ घेऊ इच्छिणार्यांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरू शकतो.
कोळंबीच्या स्लरीवर अन्य माशांचे उत्पादन
कोळंबीच्या पाँडमधील स्लरी दुसर्या पाँडमध्ये आणली जाते. थिलापिया माशांसाठी हे खाद्य असल्याने या पाँडमध्ये या थिलापिया आणि जिताडा माशांची पैदास करण्यात येणार आहे. त्यासाठी मत्स्य विभागाकडून परवानगी घेण्याची कार्यवाही सुरू आहे. पाण्याचा पूर्नवापर करण्यासाठी रिसायकल प्लाँटही तयार करण्यात आला आहे. अन्य माशांची पैदास करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही गौरव आणि दर्शना यांनी सांगितले.