रत्नागिरी:- टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील डोंगरगण हद्दीत हॉटेल रानवारा येथे रविवारी हॉटेल कामगाराचा खून झाला होता. हॉटेलमधील दुसरा कामगार अनंता रघुनाथ कांबळे (रा. कोळंबे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हा त्याच रात्री फरार झाल्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी तपास करत 48 तासांत त्याला ताब्यात घेतले.
महेश ऊर्फ सुनील नामदेव सरोदे (वय 45 वर्ष), रा. दावतपूर, ता. औसा, जि. लातूर याचा खून करून आरोपी अनंता कांबळे हा गुन्हयात वापरलेले हत्यार घेऊन पळून गेला होता. शिरूर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी वेगवेगळी पथके तयार केली.
आरोपीच्या मूळगावी, रत्नागिरी तसेच पुणे शहर व आजूबाजूचे परिसरात बातमीदार तसेच तांत्रिक पद्धतीने शोध घेतला. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार आणि अंमलदार प्रवीण पिठले यांनी विरार रेल्वे स्टेशन (जि. ठाणे) येथे तपास करत आरोपीस ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, उपनिरीक्षक अभिजित पवार, सहायक फौजदार नाजिम पठाण, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर आदींच्या पथकाने केली.