कोल्हापूरहून आलेल्या संशयास्पद औषधांची चौकशी अंतिम टप्प्यात

रत्नागिरी:- कोल्हापूर येथून रत्नागिरीत आलेल्या संशयास्पद औषधांची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. प्रांताधिकार्‍यांकडून येत्या चार दिवसात ही चौकशी पूर्ण होऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाने औषध मागविली नाही, मग ही औषध आली कशी आणि ती कोणाकडे उतरली जाणार होती, हे या चौकशीत पुढे येणार आहे. यात कोण कोण गुंतले आहे, हे स्पष्ट होणार आहे.

कोल्हापूरहून औषधाचा साठा घेऊन दोन खासगी गाड्या रत्नागिरीत दाखल झाल्या. या गाड्या संशयास्पद आठवडा बाजार परिसरात फिरताना दिसल्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली. तेव्हा हा प्रकार पुढे आला. त्या दोन्ही गाड्या खासगी ट्रान्स्पोर्टच्या होत्या. ती औषधे नक्की कोणी मागवली आहेत आणि कुठे डिलिव्हरी दिली जाणार आहे, याची कोणतीही माहिती संबंधित वाहन चालकांकडे नव्हती. याची सखोल चौकशी करण्यात आली. प्रांताधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, पोलिस यंत्रणा, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत रात्री चौकशी केली. तेव्हा ही औषधे जिल्हा रुग्णालयासाठी आल्याचे समजले; मात्र तसे असेल तर या गाड्या खाली काँग्रेसभुवनला कशाला गेल्या? त्याचा जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचार्‍यांशी संबंध आहे का? असे अनेक प्रश्‍न अजून अनुत्तरित आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याशी चर्चा केली असता, जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून अशी कोणतीही औषधांची ऑर्डर दिलेली नसल्याचे  त्यांनी स्पष्ट केले. अखेर हा विषय जास्त तापु लागल्याने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याची दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशी प्रांताधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे दिली. ही चौकशी आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या चार दिवसांमध्ये ते चौकशी अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे देणार आहे. त्यानंतर संबंधितांवर कारवाई होणार आहे आणि नेमकी औषधे कुठून आणि कशासाठी आले ते पुढे येणार आहे.