रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करतानाच जिल्ह्यातील पारंपारीक सण साजरे केले जात आहेत. तरुणाईचा जल्लोश असलेला दहीहंडी उत्सव यावर्षी शासनाचे नियम पाळूनच साजरा केला जाणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दहीहंड्यांच्या संख्येत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिल्यास दहीहंडी आयोजकांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे.
दरवर्षी पेक्षा यावर्षी दहिहंड्यांमध्ये मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात २४७ ठिकाणी सार्वजनिक १५२० ठिकाणी खासगी दहीहंडी उत्सव होणार आहे. गतवर्षी ३ हजार ४० ठिकाणी हंडी बांधण्यात आल्या होत्या. यावर्षी यामध्ये निम्म्याने घट झाली आहे.बदललेल्या नियमांसह दहीहंडी थरार अनुभवण्यास गोविंदा पथकांनी जल्लोषात तयारी केली आहे.
दरवर्षी दहीहंडी हा उत्सव सण म्हणून साजरा करण्याची पध्दत आहे. या सणाचा फायदा घेण्यासाठी राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असल्याने या सणाला मागील काही वर्षांपासून व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. दहीहंड्यांकरीता मोठ्या रक्कमेच्या बक्षीसांसह मराठी आणि काही ठिकाणी चित्रपटसृष्टीतील तार्याच्या उपस्थितीने मागील काही वर्षांपासून या सणाला ग्लॅमर प्राप्त झाले होते. मात्र यावर्षी या सर्वाला ब्रेक लागला आहे. कोरोनामुळे यावर्षी हंडीची स्पर्धा रद्द झाली आहे. तर दरवर्षी प्रमाणे यावर्षी दही हंडीचा जल्लोश पहायला मिळणार नाही.