ना. उदय सामंत; होम आयसोलेशनमुळे संसर्ग वाढत असल्याची भीती
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. उपचारात कुठे कमी पडू नये म्हणून 2 हजार 624 बेड (खाटा) तयार ठेवल्या आहेत. संपूर्ण आरोग्ययंत्रणा सज्ज आहे. होम आयसोलेशनध्ये असलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा अंदाज आहे. या सर्वांना कोविड सेंटरमध्ये हलवून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवरही अधिक भर दिला जात आहे. परंतू जिल्ह्यात अजूनतरी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
कोरोनासंदर्भात पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. ही बैठक ऑनलाइन झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी खासदार विनायक राऊत, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आदी उपस्थित होते.
ना. सामंत म्हणाले, जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 12 हजार 20 झाली आहे. मयत 388 असून मृत्यूदर 3.23 आहे. अॅक्टिव्ह रुग्ण 789 आहेत. होम क्वारंटाईन 568 तर होम आयसेलेशनमध्ये 349 आहेत. 52 रुग्ण ऑक्सिजनवर तर 6 व्हेंटिलेटरवर आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलेल्यांची संख्या 1 लाख 30 हजार 571 आहे तर 145 कंटेन्मेंट झोन आहेत. जिल्ह्यात कोरोना लस मर्यादित आहे. नियमित लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे. मला यात राजकारण आणायचे नाही; मात्र केंद्र शासन महाराष्ट्राला लस देण्याबाबत दुजाभाव करीत आहे. 99 हजार 36 जणांना लस दिली आहे. दुसरा डोस देण्यासाठीही कमी लस आहे. उद्यापर्यंत लस आली नाही तर लसीकरणाची मोहीम थांबवावी लागेल, अशी परिस्थिती आहे. यापूर्वी लस वाया जाण्याचे प्रमाण 12 टक्के होते; मात्र आरोग्य विभागाने सुधारणा करून आता फक्त 3 टक्केच लस वाया जाते. हे रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे चांगले काम आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला टार्गेट करण्यापेक्षा त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यात 2 हजार 628 बेड वाढविण्यात आले आहेत. यामध्ये 2 हजार 16 विना ऑक्सिजन, 617 ऑक्सिजन बेड, 116 आयसीयू बेड तर 138 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था केली आहे. रेमडेसिव्हर इंजेक्शनचा साठाही 10 ते 12 दिवसापर्यंत पोहोचेल एवढा आहे.