कोरोना बाधित रुग्णाचे जिल्हा रुग्णालयातून पलायन

रत्नागिरी:- जिल्हा कोव्हीड रुग्णालयात उपचार घेणारा कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत त्याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. दरम्यान रुग्णालयातून पळालेला रुग्ण हा गुहागर तालुक्यातील पडवे गावचा राहणारा असल्याची माहिती पुढे आली आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हा कोव्हीड रुग्णालयात एक रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत दाखल झाला होता.हा रुग्ण बेशुद्धअवस्थेत असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.काही दिवसांपूर्वी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.त्याच्यावर उपचार देखील सुरु होते.प्रकृती सुधारत असताना त्याला शनिवारी अतिदक्षता विभागातून बाहेर घेण्यात आले होते.

या रुग्णाला अतिदक्षता विभागातून कोव्हिडच्या जनरल विभगात शिफ्ट केल्यानंतर मध्यरात्रीच्या वेळेस त्या रुग्णाने रुग्णालयातून पलायन केले.रविवारी सकाळी हि माहिती पुढे आल्यानंतर त्या रुग्णाचा शोध सुरु झाला.सुरुवातीला हा रुग्ण जयगड येथील असल्याची माहिती बाहेर आली मात्र त्यानंतर हा रुग्ण गावखडी येथील असल्याची चर्चा सुरू होती.मात्र पोलिसांकडे असलेल्या माहितीनुसार हा रुग्ण गुहागर तालुक्यातील पडवे गावाचा असल्याची माहिती पुढे आली आहे.

या रुग्णाची पत्नी त्याच्या देखरेखीसाठी रुग्णालयात होती.मात्र वार्डमधून तो कधी पळून गेला याचा थांगपत्ता त्याच्या पत्नीला देखील लागला नाही.पती बेपता झाल्याने त्याची पत्नी त्याला शोधण्यासाठी दिनदिन फिरत होती.मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

रुग्णालयात उपचार घेणारा रुग्ण रुग्णालयातून पळून गेला तरी त्याबाबत रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीच तक्रार पोलीस स्थानकात रुग्णालयाकडून ण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तर कोव्हीड रुग्णांवर लक्ष ठेवण्यासठी पोलीस बंदोबस्त रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.असे असताना कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयातून पळून जातो जी हि आश्चर्यकारक असून रुग्णालयातील कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.