रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊनच्या काळात प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या रत्नागिरी जिल्हयातील 375 कलाकारांना 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातील निकषांच्या आधारावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकरकमी अनुदानास पात्र ठरले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतच्या समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा निवड समितीने सर्वानुमते अनुदान वाटपाचा निर्णय घेतला.
लॉकडाऊनच्या काळात आणि लॉकडॉऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाटयगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहिलेल्या राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कलाप्रकारातील कलाकारांना शासनामार्फत आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातुन एकूण 656 कलाकरांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी शासन निर्णयातील निकषांच्या आधारावर जिल्हा निवड समितिच्या निर्णयानुसार 281 कलाकारांचे अर्ज अपात्र ठरले असून 375 कलाकारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
पात्र ठरविलेल्या सदर 375 कलाकारांची बँक तपशीलासह यादी मा. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचेकडे सादर करण्यात येईल व त्यांचे मार्फत संबंधित कलाकारांच्या बँक खात्यामध्ये एकरकमी अर्थसहाय्याची रक्कम- प्रति कलाकार रू. पाच हजार रुपये वर्ग करण्यात येतील.