नियोजनमधून निधी मंजूर; ना. सामंत यांची माहिती
रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेतील टेस्टिंग कीटचा तुटवडा भासू देणार नाही. तीन दिवस पुरतील एवढी कीट आहे. ज्या एजन्सीकडुन कीट खरेदी केली होती. त्या एजन्सीचे थकीत पैसे तत्काळ देण्यासाठी 65 लाख जिल्हा नियोजनमधुन मंजुर केले आहेत. कीट आणण्यासाठी एक ट्रक पुण्याला पाठवला आहे. दोन दिवसात ते उपलब्ध होऊन तुटवड्याबाबतचा संभ्रम दूर होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही वाढले आहे. नवीन टेस्टिंग कीट खरेदी करण्याची प्रक्रिया टेंडर प्रक्रियेमध्ये अडकल्याची माहिती पुढे आली आहे. तीन दिवस पुरतील एवढीच कीट जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. ज्या एजन्सीकडुन कीट घेतले होती, त्याचे 45 लाख रुयपे देणे असल्याचे समजते. त्याबाबत पालकमंत्री अनिल परब यांनीही लक्ष घातले आहे. जर टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही, तर उसनवारीवर कीट मागवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. कीटचा तुटवडा भासत असल्याने 50 कीटची मागणी केली आहे. त्यापैकी आता 30 कीट आली आहेत. एका किटमध्ये साधारण 96 टेस्ट केल्या जातात. दोन ते तीन दिवसाच्या कालावधीमध्ये नवीन कीट यायला हवी अन्यथा कीटअभावी तपासणीवर परिणाम होणार आहे.
याबाबतील उच्च तंत्रशिक्षणंत्री उदय सामंत म्हणाले, मी या विषयाची माहिती घेतली. जिल्हा रुग्णालयात
तीन दिवस पुरतील एवढी टेस्टिंग कीट आहेत. दरम्यान पुर्वीच्या एजन्सीची थकीत रक्कम आणि आता नव्याने खरेदी करण्यासाठीची रक्कम म्हणून 65 लाख रुपये जिल्हा नियोजनमधून मंजूर केले आहेत. कीट आणण्यासाठी एक ट्रक पाठविण्यात आला आहे. दोन दिवसात कीट उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रयोगशाळेत कीटचा तुटवडा असल्याबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.