कोरोना अहवाल देण्यास विलंब करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; मंडणगडातील कोरोना चाचणी अहवाल प्रकरण

रत्नागिरी:-मंडणगड तालुक्यातील कोरोना चाचणीचे अहवाल तीन-चार दिवस नव्हे़ तर चक्क ९ दिवसांनी मिळाले. या कालावधीत बाधित आठ दिवस निर्धास्तपणे फिरत होते. हे तालुक्यातील सुपरस्प्रेडर ठरू शकतात. यातील अजून १०० चाचण्यांचा अहवाल येणे बाकी आहे. याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. विलंब करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.

मंडणगड तालुक्यातील अनेक नागरिकांचे स्वॅब २५ ते २९ मे रोजी घेण्यात आले होते. दोन किंवा तीन दिवसात चाचणी अहवाल येणे अपेक्षित आहेत; मात्र २ जूनला हे अहवाल आले. या आठ दिवसामध्ये संबंधित लोक निर्धास्त फिरत होते. त्यांच्यावर आरोग्य विभागाची किंवा ग्राम कृतिदलाचे कोणतेही नियंत्रण नव्हते. धक्कादायक म्हणजे १७९ जणांचे अहवाल २ जूनला पॉझिटिव्ह आले. आरोग्य यंत्रणेसह त्या भागातील ग्रामस्थांची झोपच उडाली. हे सर्व बाधित गेले आठ दिवस इतरत्र बिनधास्त फिरत होते. हे कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरले असावे, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मंडणगड तालुक्यातील भिंगळोलीत २, दहागाव ३, घराडी २४, गोठे ७, कळलवणे १३, कांटे २९, कोंडगाव २५, कुंबळे १ , मंडणगड शहर १९, सोवेली २, सुर्ले १, पाट १, आंबवणे १, चिंचघर १, देव्हारे १, नायणे ३, पाचरळ ३७, म्हाप्रळ ८ या गावातील सर्व बाधित आले आहेत. एवढेच नाही तर अजून १०० चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यात आरोग्य विभागाकडून असा हलगर्जीपणा होणे योग्य नाही. या विलंबामुळे मंडणगड तालुक्यात सर्वत्र कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, मंडणगडमधील हा प्रकार गंभीर आहे. चाचणीचे अहवाल देण्यास एवढा वेळ लागणे चुकीचे आहे. कोरोना पसरण्याची भीती आहे. त्यामुळे विलंबाला कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची नोटीस दिली आहे.