सात दिवसात ‘सारी’चे रुग्ण दुप्पट
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असताना कोरोना सोबत आता ‘सारी’ तापाचा धसका अनेकांनी घेतला आहे. सारी तापाचे रुग्ण आठवड्यात दुपटीपेक्षा अधिक वाढले असून आतापर्यंत 116 जणांना ‘सारी’ या रोगाची लागण झाली आहे तर आतापर्यंत या रोगाने 13 बळी घेतल्याने कोरोनापाठोपाठ सारी रोगाची दहशत लोकांच्या मनात भरली आहे.
सारी हा समुहरोग असून त्यात अनेक आजारांचा समावेश आहे. कोरोना विषाणू व सारीचा थेट कोणताही संबंध नाही. तरीही कोरोना हा सारीपैकी एक असल्याचे तज्ञ वैद्यकीय अधिकार्यांमार्फत सांगण्यात आले. जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचाराला आलेल्यापैकी 13 जणांचा आतापर्यंत सारी तापाने मृत्यू झाला आहे. कोरोना पाठोपाठ सारी रोग झपाट्याने पसरू लागल्याने अनेकांची पाचावर धारण बसली आहे. या रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या देखील अधिक असल्याने अनेकजण भीतीच्या छायेखाली आहेत.
दरम्यान जिल्हा रूग्णालयाने शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविलेल्या अहवालात सारी तापाने आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जिल्हा शासकीय रूग्णालयात सारी तापाचे 116 रुग्ण सापडल्याचे स्पष्ट झाले आहे.