रत्नागिरी:-कोरोनामुळे शेताच्या बांधावर खते व बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. पावस परिसरात 80 लाभार्थ्यांना 612 किलो खतांचे वाटप केले गेले. कोरोना रुग्ण सापडत असल्याने निर्बंध असल्याने शेतकर्यांना दुकानांमध्ये येता येत नाही. कृषी विभागाच्या उपक्रमामुळे शेतकर्यांना दरवाज्यात सुविधा मिळत आहेत.
कोरोनाचे रुग्ण गावागावात वाढत आहे. संचारबंदीमुळे वाहतूकीची साधने नसल्यामुळे शेतकर्यांना आवश्यक खरेदीसाठी बाजारपेठांपर्यंत पोचता येत नाही. सध्या खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरु आहे. कृषी विभाग शेतकर्यांच्या मदतीला सरसावला आहे. वाडी प्रमुख, सरपंच यांच्या सहकार्याने बियाणे, खतांची यादी तयार केली जाते. ती कृषि विभागापर्यंत पोचवतात. पावसमध्ये मंडळ कृषी अधिकारी माधव बापट, कृषिसेवक ज्ञानेश्वर राऊत (गावखडी), कृषी सेवक धनाजी पोळ(घोळप) यांनी पावस प्रभागातील विविध भागात घरपोच बियाणे उपलब्ध व्हावे म्हणून थेट बांधावर बियाणे वाटप उपक्रम हाती घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी किरण तोडणकर, सरपंच मुरलीधर तोडकर यांच्या उपस्थितीत त्याचे वितरण केले जाते.
पावस येथे भात पीक शेतीशाळेचा पहिला वर्ग घेण्यात आला. त्यासाठी शेतकरी निवड, 3 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, भात उगवण क्षमता चाचणी याबाबत माहिती देण्यात आली. भात लावणीपासून ते भात काढणीपर्यंतची माहिती यामध्ये दिली गेली. तसेच कोरोना मुळे मास्क वापर, सुरक्षित अंतर वापरणे याकडे कटाक्षाने लक्ष ठेवले होते. रोहिणी पंधरवडा अंतर्गत भात बियाणे बीजप्रकिया व उगवण क्षमता प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आली. पीक विमा योजनेचीही माहिती यावेळी देण्यात आली.