कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी चाचणी एकमेव पर्याय

डॉ. इंदूराणी जाखड; उपचारासाठी गावातच विलगीकरण

रत्नागिरी:- चाचणी वेळेत न झाल्यामुळे सौम्य लक्षण असलेले रुग्ण कोरोना वाहक ठरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाडीच्या वाडी बाधित येत आहे. हे टाळण्यासाठी वेळेत चाचण्या करुन घेतल्या पाहीजेत. असे झाले तरच कोरोना संक्रमण थांबेल आणि जिल्हा कोरोना मुक्त होईल, असा विश्‍वास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी व्यक्त केला.

कोरोतील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मोहीमेसंदर्भात डॉ. जाखड यांनी व्हीडीओद्वारे ग्रामस्थांना आवाहन केले आहे. जिल्हा कोरोना मुक्तीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेंतर्गत ‘माझं गाव, माझी जबाबदारी’ मोहीम राबवित आहोत. जिल्ह्यात दोन हजार लोकसंख्येच्या गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्यात येत आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी त्याला चांगला प्रतिसाद दिला असून अशी केंद्र सुरु केली आहेत. त्यामध्ये काही बाधितांना ठेवण्यात आले आहे. अनेक ग्रामस्थांमध्ये कोरोना चाचणीविषयी गैरसमज आहेत. चाचणीसाठी जाण्याची भिती आणि त्याचा मला काय फायदा असे प्रश्‍न मनामध्ये निर्माण होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. कोरोना चाचणी वेळेत केली नाही तर सौम्य लक्षण असल्यास ती लक्षात येत नाहीत. त्याचे आजारात रुपांतर होईपर्यंत रुग्ण सगळ्यांच्या संपर्कात जातो आणि तिथूनच कोरोना वाढू लागतो. रत्नागिरी तालुक्यातील एक वाडी अशाच पध्दतीने पूर्णपर्ण बाधित आल्याची घटना चार दिवसांपूर्वी उघड झाली आहे. चाचणीनंतर 95 टक्के ग्रामस्थ बाधित होते. यामध्ये एक रुग्ण दुसर्‍याला भेटण्यातूनच हा गोंधळ झाला आहे. लक्षणे दिसून आली की तत्काळ आरोग्य यंत्रणा किंवा ग्राम कृती दलाशी संपर्क साधून संबंधितांनी चाचणी करुन घेतली पाहीजे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनाही चाचणीसाठी प्रवृत्त करावेत. या पध्दतीने ज्यावेळी अंमलबजावणी होईल, तेव्हाच कोरोना संक्रमण थांबेल. तसं झालं तरच वाडी, गाव आणि जिल्हा कोरोना मुक्त होण्यास वेळ लागणार नाही.

गावाजवळ विलगीकीकरण केंद्र असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येऊन बाधितांना बेड न मिळाण्याच्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. तसेच अनेकांना गावापासून दूर जावे लागण्याची भितीही बाळगावी लागणार नाही. कुटूंबापासून लांब राहावे लागत असल्याने लक्षणे असली तरीही चाचणीसाठी अनेकजणं पुढे येत नाहीत. सध्या गावांमध्ये सुरु केलेल्या केंद्रात लक्षणे नसलेले किंवा कमी लक्षणे असलेल्यांना ठेवण्यात येत आहे. या ठिकाणी आशा, अंगणवाडी सेविकांचे लक्ष राहणार आहे. त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. केंद्रातील दाखल बाधितांचे तापमान, ऑक्सीजनचा स्तर नियमित तपासला जाईल. आवश्यकता वाटल्यास अधिक उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविले जाईल. उपचार वेळेत झाले तर बाधित लवकर बरा होऊ शकेल. यासाठी ग्रामस्थांनी चाचण्यांसाठी त्वरीत पुढे आले पाहीजे. आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना सहकार्य करावे. जोपर्यंत लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत विलगीकरण हाच एकमेव पर्याय आहे असे आवाहन डॉ. जाखड यांनी केले आहे.