कोरोनापासून प्रवाशांच्या बचावासाठी एसटीला सुरक्षा कवच 

८२६ गाड्यांना अ‍ॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग

रत्नागिरी:- कोरोना महामारीमध्ये एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी लाखो भाविक कोकणात येतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी एसटी गाड्यांना अ‍ॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे. प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून सुरक्षा कवच मिळावे, म्हणून प्रथमच मोठा प्रयोग एसटी महामंडळ केला आहे. जिल्ह्यातील ८२६ गाड्यांना अ‍ॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग केले जाणार आहे. त्यासाठी नियुक्त एजन्सीचे कर्मचारी रत्नागिरी येणार आहेत.

महामंडळाने काढलेल्या परिपत्रक येथील एसटी विभागाला प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने एसटी विभागाने किती गाड्यांना कोटिंग करायचे आहे, याची माहिती महामंडळाला कळविली आहे. कोरोनामुळे राज्यभरातील एसटी महामंडळाचे चाक दीड वर्ष झाले थांबले होते. संसर्ग कमी झाल्यामळे आता काहीसे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरू झाल्याने एसटी महामंडळाला दिलासा मिळाला आहे. एसटी सुरू झाली असली तरी महामंडळ १६ हजार कोटींच्यावर तोट्यात आहे. संसर्गाच्या भीतीने गणेशोत्सवात भारमान घटू नये, यासाठी एसटीने महामारीच्या काळात प्रवासांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने राज्यातील सुमारे १० हजार गाड्यांना अॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरी एसटी विभागाच्या ८२६ गाड्यांचा समावेश आहे.

एसटीमध्ये अनेक ठिकाणी प्रवाशी स्पर्श करतात. ज्यामुळे कोरोना व साथरोग पसरविणाऱ्या विषाणूंचा धोका वाढू शकतो. हा धोका टाळण्यासाठी महामंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एजन्सी निवडण्याची निविदा काढण्यात आली आहे. अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग वैज्ञानिकरित्या सिद्ध झाले आहे की, ते कोरोना व्हायरस, विषाणू, बुरशी व इतर जीवाणूंपासून सरंक्षण देते.

बसमध्ये विविध जागी होणार कोटिंग

एसटी बसमधील सर्व सीट, हॅंड रेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, रेलिंग, ड्रायव्हर केबिन, फ्लोअरिंग, रबर ग्लेझिंग्ज, पॅसेंजर दरवाजा आणि आपत्कालीन दरवाजा बाहेरील व आतील बाजू, सामान कक्षाची बाहेरील व आतील बाजू, अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग केले जाणार आहे.