रत्नागिरी:- कोरोनाचे वाढते प्रमाण आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये अॅक्शन प्लॅन तयार करण्याचा निर्णय झाला. यामध्ये टास्क फोर्सशी चर्चा करून त्यांनी केलेल्या सूचनेवर कार्यवाही सुरू आहे. कोणतेही राजकारण न आणता कोविडला घालावायचा असेल तर मिळून लढा देण्याचा सर्वपक्षीय संकल्प केला. व्यापारी वर्ग आधीच अडचणी आहेत. त्यांच्यावर कोणताही कायदेशीर बडगा उगारू नये, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी झुम अॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. त्यात लॉकडाऊनसारखा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर अधिकार्यांची बैठक घेतली, व्यापार्यांची बैठक झाली, सर्वपक्षीय बैठक घेतली. टास्क फोर्स कशी कारवाई करणार आहे त्याबाबत बैठक झाली. राजकीय बैठकीमध्ये सेनेकडुन खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, काँग्रेसचे प्रदेश सचिव रमेश कीर, राष्ट्रवादीचे बशिर मुर्तुझा, भाजपमार्फत उतर जिल्हाध्यक्ष विनय नातू, दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, बाळ माने, मनसेचे वैभव खेडेकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदी उपस्थित होते. यामध्ये अॅक्शन प्लॅन करण्यात आला. यामध्ये कोणतेही राजकारण न आता कोविडला घालवायचा असेल तर मिळून लढा दिली पाहिजे असा संकल्प केला. लॉकडाऊनसारखा कठोर निर्बंध आता लावण्याची वेळ आली आहे. त्यासाठी नवीन कोविड सेंटर, आरोग्य व्यवस्थेची तयारी, कशी असावी हे निश्चित झाले. तशी तयारी प्रशासनाने केली आहे. अडीच हजाराच्या वर बेड आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन बेडपासून इतर बेडची व्यवस्था आहे. टास्कफोर्सशी चर्चा झाली, त्यांनीही काही काही सूचना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
व्यापार्यांच्या बैठकीत देखील महत्त्वाचे निर्णय झाले. व्यापार्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे ठरले. त्यासाठी कॅम्प घेतले जाणार आहे. आधीच व्यापारी वर्ग अडचणीत आहे त्यांच्यावर कोणताही कायदेशीर बडगा उगारू नये, अशा सुचना प्रशासनाला केल्या आहेत. व्यापार्यांनीही शासनाने कडक निर्बंध घातले तर सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.