रत्नागिरी:- मागील दोन वर्षे कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात बरीच उलथापालथ झाली होती. शाळा- महाविद्यालयांचे वेळापत्रकच कोलमडले होते. मात्र आता सर्व स्थिर झाल्याने नियमित शैक्षणिक कामकाज सुरळीत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दुसर्या सत्रातील विविध उपक्रमांतर्गत शैक्षणिक सहलींच्या आयोजनांचे बेत आखले जात आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पर्यटनाची संधी मिळणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
कोरोना काळात सर्व शाळा- महाविद्यालयांचे वर्ग ऑनलाईन भरत होते. त्यामुळे विविध शैक्षणिक उपक्रमही ऑनलाईनच पार पडले. शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र यावर्षी नवीन शैक्षणिक वर्ष कोरोनापूर्व काळातील नियमावलीप्रमाणे सुरु झाले. शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरु असून, त्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये सध्या शैक्षणिक सहलींच्या आयोजनांचे बेत आखले जात आहेत.
तब्बल दोन वर्षानंतर शैक्षणिक सहलीतून सवंगड्यांना पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये सहलीची उत्सुकता वाढली आहे. त्याही पुढे जाऊन चांगल्या पर्यटनस्थळाला भेट देता यावी, यासाठी अनेकांकडून सहलीच्या ठिकाणांचे गुगलवर सर्चिंग केले जात आहे. पर्यटन स्थळाच्या माहितीबरोबरच निवास व भोजन व्यवस्था, आर्थिक बजेट, वाहतुकीचा मार्ग याचाही घेतला जात आहे.
सहल कमिटीच्या शिक्षकांकडून मुख्याध्यापकांच्या परवानगीसह इतर सर्व कागदपत्रांची जमवा जमव केली जात आहे. त्यासाठी शैक्षणिक कामकाजाव्यतिरिक्त ही कामे करावी लागत असल्याने धावपळ होत असली तरी उत्साह मात्र कायम आहे.
डिसेंबर आणि जानेवारी महिना म्हणजे सहल व पर्यटनाचा हंगाम असतो. त्यातही शैक्षणिक सहल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणीच असते. त्यांचा पर्यटनाबरोबरच पर्यावरण अभ्यासही होत असतो. सहलीदरम्यान ऐतिहासिक वास्तू व वारसा स्थळांना भेटी देऊन त्या-त्या ठिकाणाचे महत्त्व, इतिहास याचे ज्ञान अवगत केले जाते. तसेच त्यातून प्रवास वर्णन, तेथील भौगोलिक वैशिष्ट्यांची तोंडओळख विद्यार्थ्यांना होते.