कोरोनानंतर जिल्हा पोलीस दलातील ९० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरी:-जिल्हा पोलिस दलातील ९० पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. एकच ठिकाणी पाच ते सहा वर्षे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. २३ पोलिस नाईक, ११ चालक, ४५ पोलिस हवालदार आणि ११ सहायक पोलिस फौजदारांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी नुकतेच बदल्याचे आदेश काढले. संबंधितांनी बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेशही त्यांनी जारी केले आहेत.

पोलिस दलामधील बदल्या यंदा वेळेवर झाल्या आहे. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी या प्रशासकीय बदल्यांचा झाल्यामुळे कर्मचरी समाधानी आहेत. अन्यथा जूनमध्ये काहीवेळा बदल्या केल्या जातात. त्यामुळे मुलांच्या प्रवेशासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ व त्यामधील (सुधारीत) सन २०१५ मधील कलम २२ (न) (१) नुसार २० मे २०२२ ला जिल्ह्यातील पोलिस दलाच्या आस्थापन मंडळाच्या आयोजित बैठकीत बदल्यांचा निर्णय झाला. अनेक कर्मचारी विविध शाखा आणि पोलिस ठाण्यात पाच
ते सहा वर्षांच्या वर कार्यरत आहेत, अशा तक्रारी वाढल्या होत्या. त्याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षकांनी तत्काळ निर्णय घेतला आहे.

दोन पोलिस हवालदार शिरीश भोसरे यांची पोलिस मुख्यालयातून लांजा पोलिस ठाण्यात तर सुशिल पंडित याची पोलिस मुख्यालयातून जयगड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २३ पोलिस नाईक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये अनेकांना पोलिस ठाणी दिली आहेत तर काहींना पोलिस मुख्यलयात घेतले आहे. तसचे अकरा चालक पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये चालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ते चालक पोलिस नाईक पदावरील कर्मचारी आहेत.

तसेच पोलिस दलातील ४५ पोलिस हवालदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्येही बहुतेकांना पोलिस ठाणी दिली आहेत. तर काहींनी पोलिस मुख्यालयात घेतले आहे. ११ सहाय्यक पोलिस फौजदारांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे, असे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. गर्ग यांनी दिले आहेत. त्यामुळे पोलिस
कर्मचाऱ्यांची आता बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे.