कोरोनाच्या संकटात सापडलेल्या रत्नागिरीकरांना मोठा दिलासा…

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात गणेशोत्सवानंतर सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत होती. वाढत असलेली रुग्णसंख्या चिंतेची बाब ठरत असताना मागील दोन दिवसांपासून रत्नागिरीकरांना दिलासा मिळेल अशी स्थिती आहे. दोन दिवसात रत्नागिरी तालुक्यात अवघे 28 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात मंगळवारी केवळ 13 रुग्ण सापडले.
 

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येने साडेसहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात सर्वाधिक रुग्ण जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी तालुक्यात सापडल्याने चिंतेत भर पडली. तालुक्यात आतापर्यंत जवळपास 1 हजार 900 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 1 हजार 400 जणांनी कोरोनावर मात केली असली तरी आता पर्यंत सर्वाधिक बळी देकगील रत्नागिरी तालुक्यातच गेले आहेत.तालुक्यात 66 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

मात्र मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर खाली आले आहे. दोन दिवसात केवळ 28 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सोमवारी 15 तर मंगळवारी केवळ 13 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाच्या संकटात सापडलेल्या रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.