कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालके, तरुणही बाधित

रत्नागिरी:- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तरुण आणि बालकेही बाधित होऊ लागली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दहा वर्षांखालील 148 बालके, तर 30 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील 1 हजार 246 जणं बाधित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या वीस दिवसांत 1 ते 30 वर्षे वयोगटातील 1 हजार 394 रुग्ण सापडले आहेत. यातील सर्वचजणं उपचारानंतर बरे झाले ही त्यातील सकारात्मक बाब आहे.

दुसर्‍या लाटेमध्ये जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांमध्ये दररोज पाचशेच्या सरासरीने बाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा विळखा वाढत असल्यामुळे नागरिकांमधील चिंता वाढत आहे. पहिल्या लाटेत बाधितांच्या संख्येत सर्वाधिक टक्का साठ वर्षांवरील आणि को मॉर्बिंड रुग्णच होते; मात्र मार्च महिन्यात सुरु झालेल्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव अत्यंत वेगाने सुरु झाला आहे. शिमगोत्सवासह विविध सण, उत्सवामुळे नागरिक एकमेकांच्या संपर्कात आले होते. परिणामी जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सध्या उपचाराखालील रुग्णांची संख्या पावणेतीन हजार आहे. एप्रिल महिन्यातच सहा हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बालके आणि युवकांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. त्यामुळे पाल्यांसाठी अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. तरीही घरामध्ये असलेली बालके, तरुण, युवक बाहेरुन येणार्‍यांच्या संपर्कात येत असल्याने बाधित होऊ लागल्याची कारणे पुढे येत आहेत. संचारबंदीमध्ये एमआयडीसी परिसरातील उद्योग सुरु आहेत. त्यात अनेक तरुण-तरुणी कामाच्या निमित्ताने बाहेर पडत आहेत. कंपन्यांमध्ये एकमेकांशी संपर्क वाढल्यानेही बाधित आल्याचे एक कारण पुढे येत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पालकांचा कामानिमित्त बाहेर जाणे-येणे वाढल्याने दहा वर्षांखालील मुलांची बाधितांमधील संख्या वाढलेली आहे.