रत्नागिरी:- जिल्हा रूग्णालयात एकाचवेळी सर्वांची तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही घरोघरी जावून तपासणी करीत आहोत, असे सांगून सिव्हील हॉस्पिटलमधून लॅब कर्मचारी आलोय असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतयाच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
सध्या कोरोनाच्या नावाखाली अनेकजण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या नावाचा वापर करून ऑनलाईन फसवणूकदेखील करण्याचे प्रकार वाढले होते. आता तर जिल्हा रूग्णालयातील लॅबमधील कर्मचारी बनून रत्नागिरीकरांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पीपीई कीट परिधान करून एक संशयित शांतीनगर परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये गेला होता. एका महिलेच्या सदनिकेची बेल वाजवून त्याने आत प्रवेश केला. त्यावेळी आपण जिल्हा रूग्णालयातील लॅब असिस्टंट असल्याची ओळख सांगितली. या भामट्याने जिल्हा रूग्णालयातून आलोय असे सांगून त्या महिलेला आपले बनावट ओळखपत्र दाखविले. कोरोनाचे रूग्ण अधिक वाढताहेत. सर्वांची एकाचवेळी तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे घरोघरी जावून आम्ही तपासणी करीत असल्याचे त्याने यावेळी सांगितले.
या भामट्याने घरातील सदस्यांची कोरोना तपासणी झालेय का? असे विचारून त्या महिलेसह त्यांच्या एका मुलाची चक्क अँटीजेन टेस्ट त्या तोतयाने केली आणि दुसऱ्या दिवशी रूग्णालयातील कर्मचारी तुमचा रिपोर्ट घेऊन येतील असेदेखील त्याने सांगितले. जिल्हा रूग्णालयातून घरोघरी जावून कोरोनाची तपासणी सुरू असली तरी आम्ही एका तपासणीचे २०० रूपये घेतो असे सांगून त्या भामट्याने महिलेकडून ४०० रूपये उकळले व तेथून पोबारा केला.
पैसे घेऊन गेल्यानंतर त्या महिलेला संशय आला. कोरोना तपासणीचे पैसे कसे घेतले अशी शंका आल्याने तिने आपल्या पतीला त्याबाबतची माहिती मोबाईलवरून दिली. यावेळी पतीनेदेखील कोरोना तपासणीसाठी पैसे घेतले जात नाहीत असे सांगितले. हा तोतया लॅब असिस्टंट मंगलमूर्ती अपार्टमेंटमधून बाहेर पडल्यानंतर साई प्रेरणा अपार्टमेंटमध्ये शिरला होता. त्याचवेळी त्या महिलेचा पती घरी आला आणि त्याने याची विचारणा केली. आलेला व्यक्ती समोरच्या इमारतीत गेल्याचे समजताच त्या तोतयाची चौकशी सुरू झाली.
साई प्रेरणा अपार्टमेंटमध्ये पकडलेल्या त्या तोतयाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे साऱ्यांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर त्याला घेऊन खात्री करण्यासाठी नाचणे ग्रामपंचायतीत घेऊन जात असतानाच त्याने तेथून पळ काढला. लॅब असिस्टंट बनून आलेला तोतया सिल्व्हर कलरच्या गाडीवरून पळून गेला. त्याच्या गाडीचा नंबर एमएच-०८/व्ही-७११५ असल्याचे अनेकांनी पाहिले. त्यामुळे त्या नंबरवरून त्याचा पाठलाग सुरू झाला. मिरजोळे एमआयडीसीतील रेल्वे ब्रिजखाली त्याला हनुमाननगर येथे पकडण्यात आले.
मिरजोळे-हनुमाननगर येथे पकडलेला भामटा हा उद्यमनगर येथील रहिवासी असून अल्तमज मुनाफ पेटकर, रा. एकतामार्ग असे त्याचे नाव असल्याचे तपासात पुढे आले आहे. हा प्रकार गंभीर असल्याने त्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. ही माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयित अल्तमज पेटकर, रा. एकता मार्ग याला ताब्यात घेतले. त्याने साई प्रेरणा अपार्टमेंटमधील काहींची अशीच फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी मंगलमूर्ती अपार्टमेंटमधील त्या महिलेने शहर पोलीस स्थानकात दिली आहे. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अल्तमज पेटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.