रत्नागिरी:- कोकण रेल्वेमार्गावर गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, एका नोव्हेंबर महिन्यात 2 कोटी 5 लाख 52 हजार 446 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत असल्यामुळे गाड्यांना प्रचंड गर्दी आहे.
गणपती, दिवाळी, ख्रिसमस, उन्हाळा सुट्टीत विविध ठिकाणाहून कोकणात पर्यटक दाखल होत असतात. सध्या थंडीचा मोसम असल्यामुळे येथील समुद्रकिनारी पर्यटकांचा राबता वाढलेला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अनेकजणं प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. त्यामुळे दिवाळीपासून कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. आरक्षणाची प्रतिक्षायादीही मोठी असते. कोकणकन्या, मांडवी, दिवा-सावंतवाडी, तुतारी यासारख्या गाड्या दररोज हाऊसफुल्ल असतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेकजणं फुकट प्रवास करतात. यामध्ये कोकण रेल्वेचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पथके निश्चित केली आहेत. काहीवेळा अर्धे तिकिट काढून पुढे प्रवास केला जातो. काहीजण जनरल तिकिट काढून आरक्षित डब्यामधून प्रवास करतात. काहीवेळा तर आरक्षित डब्यातील तिकीटच न काढता प्रवास केला जातो. विनातिकीट प्रवास करताना कोणी प्रवास सापडला तर त्या त्या परिस्थिनुसार दंडाची रक्कम आकारली जाते. नोव्हेंबर महिन्यात गाड्यांची गर्दी लक्षात घेऊन केलेल्या तपासणीमध्ये 7 हजार 13 जणांनी विनातिकीट प्रवास केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून 2 कोटी 5 लाख 52 हजार 446 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये काही प्रवाशांना तिकिटाच्या तिप्पट रक्कमही भरणा करावी लागली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे तसेच भविष्यातही संपूर्ण मार्गावर या पद्धतीने तिकीट तपासणी मोहीम तिव्रतेने राबवण्यात येणार आहे.