कोरे मार्गावर धावले विजेवरचे इंजिन 

चाचणी यशस्वी; विद्युतीकरणही अंतिम टप्प्यात

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील प्रतिक्षेत असलेल्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून रोहा ते रत्नागिरी या 203 किलोमीटर अंतरावरील विद्युतीकरणाची इलेक्ट्रीक लोकोची प्राथमिक चाचणी गुरुवारी (ता. 25) घेण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता रोहा येथून सुटलेली गाडी दुपारी साडेतीन वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली.

कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते बेंगलोर या टप्प्याच्या विद्युतीकरणासाठी 1100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार वेर्णा येथून प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. त्यानंतर रत्नागिरी ते रोहा 204 किलोमीटरच्या विद्युतीकरणाला डिसेंबर 2018 मध्ये आरंभ झाला. कोरोनातील टाळेबंदीचा विशिष्ठ कालावधी सोडल्यास हे काम युध्दपातळीवर सुरुच ठेवण्यात आले होते. विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक स्थानकावर उपकेंद्र उभारलेली आहे. टनेल, पुल येथून विज वाहिन्या, विद्युत खांब उभारले आहेत. वाहिन्यांमधून विजेचा पुरवठा विना अडथळा सुरु होतो की नाही हे पाहण्यासाठी 22 फेब्रुवारीपासून करंट सोडण्याची चाचणी घेण्यात आली. या भागात वीजेवर चालणार्‍या रेल्वे गाड्या धावण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) इंन्स्पेक्शन लवकरच होणार आहे. याचाच एक भाग म्हणून वीजेवर चालणार्‍या इंजिनच्या चाचण्या रोहा ते रत्नागिरी सुरू झाल्या आहेत. याचा एक भाग म्हणून गुरुवारी सकाळी विजेवरील इंजिन चालवण्यात आले. सकाळी रोहा येथून साडेनऊ वाजता सोडलेले इलेक्ट्रीक इंजिन करंजाडीपर्यंत चालवण्यात आले. तेथून ते पुढे रत्नागिरी स्थानकात साडेचार वाजता दाखल झाले. रत्नागिरीतील प्रशिक्षीत कर्मचारी आणि अधिकारी या पाच जणांचे पथक रोहा येथून वीजेवरील इंजिन घेऊन निघाले. रत्नागिरीतून एक इंजिन चिपळूण ते खेड करंजाडीपर्यंत सोडून चाचणी घेण्यात आली. नियमित रेल्वे धावत असल्यामुळे वीजेवरील इंजिनला थांबा द्यावा लागत होता. सकाळी साडेनऊ वाजता सुटलेले हे इंजिन टप्प्याटप्प्याने साडेचार वाजता रत्नागिरी स्थानकात दाखल झाले. विजेवरील इंजिन चालवण्याची प्राथमिक चाचणी यशस्वी झाल्यामुळे कोकण रेल्वेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.