कोरे मार्गावरील रोहा, रत्नागिरीसह कणकवली स्थानकांवर स्वतंत्र पोलीस ठाणी 

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या स्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर सोपविण्याच्या हालचाली सुरु आहेत. या मार्गावरील तीन रेल्वे स्थानकांमध्ये स्वतंत्र पोलीस ठाणी स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यात रोहा, रत्नागिरी आणि कणकवलीचा समावेश आहे. याला कोकण रेल्वेकडुनही दुजोरा मिळाला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीतील स्थानके, प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा रेल्व सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अखत्यारित आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांची हद्द सीएसएमटी ते पनवेल आणि कर्जत, खोपोली, मंकी हिलपर्यंत आहे. रोह्यापासून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होत असून या हद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे. मुंबईच्या दिशेने येणार्‍या गाडीत कोकण रेल्वे स्थानकांदरम्यान एखादा गुन्हा घडल्यानंतरही त्याबाबतची तक्रार प्रवासी मुंबईत आल्यानंतर करतात. त्यामुणे रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांना करावे लागते. कोकण रेल्वेच्या हद्दीतून प्रवास करताना लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिलांची छेडछाड, विनयभंग किंवा अन्य मारहाणीच्या तक्रारी येतात. मात्र या हद्दीत लोहमार्ग पोलीस नसल्याने रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून कारवाई करावी लागते.

आपल्या हद्दीतील स्थानके, तसेच प्रवाशांची सुरक्षा व घडणार्‍या गुन्ह्यांचा तपास करता यावा यासाठी कोकण रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली. रोहा, रत्नागिरी आणि कणकवली येथे महत्त्वाची तीन पोलीस ठाणी स्थापन करण्यात येतील आणि या पोलीस ठाण्यांच्या अखत्यारित अन्य स्थानकांचा समावेश करण्यात येईल. त्यासाठी वरिष्ठ दर्जाचे अधिकारी, तसेच कर्मचारी आदी मनुष्यबणही उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोकण रेल्वे स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ३१ अधिकारी, ८७८ अंमलदारांची गरज आहेत. तीन पोलीस ठाणे उभारणीसाठी एक कोटी २१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकराने या प्रस्तावाला मंजूरी दिल्यास कोकण रेल्वे मार्गावरील सुरक्षा वाढण्यासोबत जवळच्या पोलीस स्थानकांचे काम हलके होणार आहे.