रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या सतर्क तिकीट तपासणी निरीक्षक टीमने तुतारी एक्सप्रेसमध्ये विसरून गेलेली रोख रक्कम असलेली बॅग लांजा येथील प्रवाशाला परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. या प्रकारामुळे कोकण रेल्वेची प्रतिमा उंचावली आहे.
दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसमध्ये तिकिट तपासणी निरीक्षक 20 मार्च रोजी आपले नियमित काम करत होते. स्लीपर कोचमध्ये एक सुटकेस आढळून आली. तेव्हा तिकीट तपासनीस नंदु मुळ्ये यांनी त्या बॅगसंबंधी आजु बाजूच्या प्रवाशांजवळ चौकशी केली. परंतु कोणीही संपर्क केला नाही. तेव्हा त्यांनी कमर्शिअल कंट्रोलमध्ये ही बाब कळविले. त्या बॅगेत मिळालेल्या आधार कार्ड वरून त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि विलवडे स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क केला. त्या प्रवाशांने तिथे चौकशी केली होती. लगेच त्या प्रवाशांनी श्री. मुळ्ये यांच्याशी संपर्क साधला व बॅगमधील मौल्यवान वस्तू व रोख 1 लाख रुपये सुरक्षित असल्याचे त्यांना सांगितले. ती सदर बॅग प्रवाशाकडे सुपूर्द केली. संबंधित प्रवाशाची ओळख पटवून देऊन कणकवली येथे ती बॅग सुपुर्द करण्यात आली. या प्रकारात तिकीट तपासनिस नंदु मुळ्ये, मिलिंद राणे, सदानंद तेली, विठोबा राऊळ, अजित परब, अटेंडंट श्री.तानावडे यांनी प्रसंगावधान राखून कोकण रेल्वेतून प्रवास करणार्यांना दिलासा दिला.