कोयनेतील वीजनिर्मिती यंत्रणेचे ८० टक्के आधुनिकीकरण

चिपळूण:- कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती करणाऱ्या यंत्रणेचे ८० टक्के आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. २० टक्के काम शिल्लक आहे. वर्षभरात ते पूर्ण करून राज्यात मागणीच्या वेळी या प्रकल्पातून सक्षमतेने वीज निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी दिली. नव्या वर्षात कोयना प्रकल्प वीजनिर्मिती करण्यासाठी पुन्हा नव्याने सज्ज असेल, असा विश्वास मुख्य अभियंता चोपडे यांनी व्यक्त केला.

वीजनिर्मिती करणाऱ्या संचामध्ये काही वर्षांपासून सातत्याने बिघाड सुरू होता. दुरुस्तीसाठी काही मशीन दीर्घकाळ बंद ठेवावे लागत होते. त्यामुळे प्रकल्पातून पूर्णक्षमतेने वीजनिर्मिती करता येत नव्हती. त्याचा परिणाम राज्याच्या वीजनिर्मितीवर होत होता. २०२१ मध्ये चिपळूणमध्ये महापूर आला. पोफळी, अलोरे परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मितीवरही परिणाम झाला होता. कोयना प्रकल्पाची उभारणी करून ६० वर्षे झाली.

तेव्हा बसवलेली यंत्रे कालबाह्य झाल्यामुळे त्याचे सुटे भागही बाजारात मिळत नाहीत. त्यामुळे वीजनिर्मिती करणाऱ्या संचाची दुरुस्ती कशी करावी, असाही प्रश्न महानिर्मिती कंपनीसमोर होता. नवीन मशीन घ्यायचे झाल्यास त्यासाठी शेकडो कोटींचा खर्च महानिर्मिती कंपनीला येणार होता. त्यामुळे आहे त्या मशीनचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी पोफळी येथील कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर आधुनिकीकरणाला गती दिली. प्रथम पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील जुनी यंत्रणा बदलली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील कालबाह्य झालेली यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा बसवली. जुनी यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा बसवण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. वर्षभरात उर्वरित काम पूर्ण होईल.

यावर्षी धरण १०० टक्के भरले

गेल्या वर्षी कमी पावसामुळे कोयना धरण १०० टक्के भरले नाही. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी आरक्षित असलेल्या पाण्याच्या साठ्यापैकी महानिर्मितीला पंधरा टक्के पाणी कमी देण्यात आले. कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर चिपळूण शहराची तहान भागवली जाते. यावर्षी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे गरज पडल्यास मागणीच्या काळात प्रकल्पातून अतिरिक्त वीजनिर्मिती करणे शक्य आहे. त्यासाठी धरणातील पाण्याचा अतिरिक्त साठा वापरावा लागणार आहे.