खेड:- भात लावणी करताना पायवाटेच्या वादातून सीताराम सावंत यांचा कोयतीने वार करून हात तोडणाऱ्या खेड तालुक्यातील वरवली येथील परशुराम कृष्णा शिगवण याला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश (वर्ग १) सुधीर एम. देशपांडे यांनी दोषी ठरवले. त्याला १८ महिने सश्रम कारावास आणि ३ लाखाचा दंड संबधितास नुकसान भरपाई म्हणून देण्याचा निकाल दिला.
आरोपीकडून देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई व्यतिरिक्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत पीडितास जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणेसाठी सरकारकडे अर्ज करण्याचा आदेशही पारित करण्यात आला.
ही घटना वरवली (ता. खेड) येथे ६ जुलै २००४ मध्ये घडली होती. आरोपी परशुराम कृष्णा शिगवण याने भात लावणी करताना पायवाटेच्या वादातुन सीताराम महादेव सावंत याचा कोयतीने मनगटावर वार केला. त्यामुळे गंभीर दुखापत होवुन सीताराम महादेव सावंत याचा हात मनगटापासुनचा तुटला. याची नोंद खेड पोलीस ठाण्यात झाली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी परशुराम कृष्णा शिगवण यांस १८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि रुपये ५ हजार इतका दंड आणि दंड न भरलेस ३ महिने कारावास आणि दंडाची रक्कम व्यक्तीस देणेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान शिक्षेस आरोपी याने अतिरिक्त सत्र न्यायालय खेड येथे अपील दाखल केले होते. याकामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. मृणाल जाडकर यांनी बाजू मांडली, दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाकडून आरोपीची १८ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा कायम करण्यात आली, तीन लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडित व्यक्तीस द.सा.द.शे. ७ टक्के व्याजदराने द्यावेत, असा निर्णय कोटनि दिला आहे. तपासिक अंमलदार श्री. शिनगारे, तसेच खेड पोलिस ठाण्याचे पैरवी अधिकारी चंद्रमुनी ठोके यांचे सहकार्य लाभले.