रत्नागिरी:- जिल्हा राष्ट्रवादीतील काही पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयाकडून दि. 5 जुलैच्या बैठकीचे निमंत्रण आले आहे. अनेकजण या बैठकीला मुंबईमध्ये जाणार असून यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होणार आहे. त्यामुळे आता या बैठकीनंतरच जिल्ह्यातील राष्ट्रवादी अंतर्गत फूट स्पष्ट होणार आहे.
अजित पवार यांच्या बंडाळीनंतर चिपळूण-संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी आपण अजित पवार यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे तर दुसर्या बाजूला राष्ट्रवादीतील नेते खा. सुनील तटकरे हे देखील अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे कोकणातील राष्ट्रवादीचे भवितव्य अधांतरी आहे. त्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून अनेकजण चर्चा करीत आहेत. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील पदाधिकार्यांची दि. 5 रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हाभरातील पदाधिकार्यांना बोलावणे आले आहे. तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांना या बाबत दूरध्वनी करण्यात आले असून 5 रोजी मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीसाठी उपस्थित राहाणार आहेत
रमेश कदम यांना बैठकीचे निमंत्रण…
चिपळूणचे माजी आमदार व राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून काही काळ शरद पवारांच्या सोबत असलेले रमेश कदम हे 5 रोजी शरद पवार यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांनाही या बैठकीचे निमंत्रण आले असून ते बैठकीला जाणार आहेत. या संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, आपण 5 रोजीच्या बैठकीला जाणार आहोत. त्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले. श्री. कदम हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत.