समन्वयाच्या बैठकाच रद्द; उमेदवाराचा नाही पत्ता
रत्नागिरी:- उमेदवारीवरून संबंध ताणलेल्या महायुतीतील गोंधळ आणखी वाढतच चालला आहे. जागेसाठी शिवसेना-भाजप दोन्ही पक्ष आग्रही असल्याने आधीच स्वतंत्र प्रचार आणि सभा सुरू आहेत. त्यात महायुती म्हणून गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर होणाऱ्या समन्वयाच्या बैठका अचानक रद्द करण्यात आल्याने राजकीय संबंध अधिक दुरावल्याचे चित्र आहे. उमेदवार जाहीर न झाल्यामुळे समन्वय समितीद्वारे कोणाचा प्रचार करायचा, असा प्रश्न दोन्ही पक्षांपुढे असल्याने या बैठका रद्द झाल्याचे समजते.
शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेस या महायुतीमध्ये गोंधळ वाढला आहे. जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांमध्ये समन्वय रहावा यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांची बैठक काल झाली. त्यानंतर जिल्ह्यात समन्वय साधण्याबाबत प्रयत्न सुरु झाले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांनी विशेष प्रयत्नांना सुरुवात केली होती. सकाळी ११ वाजता शिवसेना दक्षिण व भाजप पदाधिकारी यांची बैठक होणार होती. यानंतर प्रमुख पदाधिकार्यांची बैठक भाजपा कार्यालयात होणार होती. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. तरी अचानक या बैठका रद्द करण्यात आल्याचे संदेश पक्षातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
शिवसेनेला मात्र वरिष्ठ पातळीवरुन याबाबतचे आदेश नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आज होणार्या समन्वयाच्या बैठका रद्द करण्यात आल्याचे समजते. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये कोणी कोणाचा प्रचार करायचा हा मुळ मुद्दा आहे. महायुतीचा उमेदवारच जाहिर न झाल्यामुळे दोन्ही पक्षांपुढे हा पेच आहे. सध्या भाजप धनुष्यबाणाचा किंवा शिवसेना कमळाचा प्रचार करतील अशी परिस्थिती नाही. कारण दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. पक्षांतर्गत उमेदवारही निश्चित झाले असून त्यानुसार पक्षांनी प्रचार सुरू ठेवला आहे. त्यामुळे महायुतीतील गोंधळ कायम असून संबंध अधिकच ताणल्याची स्थिती आहे.
महायुतीत चढाओढ
दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी समन्वय समितीच्या बैठका रद्द झाल्याचे कोणतेही ठोस कारण दिले नाही. परंतु आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये दोन्ही पक्षांना खात्री आहे की उमेदवारी आपल्यालाच मिळणार. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपापली स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवली आहे. सभा सुरू ठेवल्या आहेत. पक्षांतर्गत ही चढाओढ महायुतीला अडचणीची ठरण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविली आहे.