कोकण रेल्वे विद्युतीकरणाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण 

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्याचा राष्ट्रार्पण सोहळा सोमवारी (ता. २०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून ते बेंगळुर येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी, मडगाव आणि ऊडपी या तीन ठिकाणी दुपारी २.२० वाजता कोकण होणार आहे.

‘भारतीय रेल्वेचे शंभर विद्युतीकरण मिशन – नेट झिरो कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल’ या योजनेंतर्गत लोकांना पर्यावरणपूरक, हरित आणि स्वच्छ वाहतुकीचे मार्ग प्रदान करण्यासाठी संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये कोकण रेल्वेचा ७४१ किलोमीटरचा मार्ग समाविष्ट केला होता. यामध्ये महाराष्ट्र ३८२ किमी, गोवा १६३ किमी, कर्नाटक २९४ किमी मार्ग आहे. विद्युतीकरणाची पायाभरणी नोव्हेंबर २०१५ मध्ये झाली आणि मार्च २०२२ ला पूर्ण झाले. या प्रकल्पाची एकूण किंमत १ हजार २८७ कोटी रुपये आहे. हे काम ठोकुर-बिजूर, बिजूर ते कारवार, कारवार ते थिविम, थिविम ते रत्नागिरी आणि रत्नागिरी-रोहा अशा पाच टप्प्यात करण्यात आले. कोरोना काळातही काम थांबणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे सात वर्षांमध्ये विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले.
कोकण रेल्वेचा अवघड भूभाग आणि अनुकूल वातावरण यामुळे विद्युतीकरण प्रकल्प हे रेल्वे प्रशासनापुढे आव्हानात्मक होते. मात्र त्या परिस्थितीवर मात करत रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण केले. पावसाळ्यात तीव्र पडणार्‍या पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली आहे. गोव्याकडील भागातील टप्प्याचे काम सर्वात प्रथम पूर्ण झाले. त्यानंतर रोहा ते रत्नागिरी या टप्प्याचे काम करण्यात आले. सर्वात शेवटी रत्नागिरी ते थिविम या नव्वद किलोमीटर भागाचे विद्युतीकरण झाले. करबुडेसारखे मोठे टनेल या मार्गावर असल्यामुळे त्यामध्ये विद्युतीकरणाची यंत्रणा बसवण्याचे सर्वाधिक आव्हान प्रशासनापुढे होते. ते लिलया पार पाडले आहे. या कामाचा राष्ट्रार्पण सोहळा उद्या दुपारी होणार आहे. सध्या मालगाड्या आणि दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी विजेवर चालवली जात आहे. गोव्याकडील कामातील त्रुटी पूर्ण केल्यानंतर लवकरच सर्वच गाड्या विजेवर चालवण्यात येणार आहेत.