रत्नागिरी:- देशभरात जवळपास चौदा मार्गांवर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर कायमस्वरुपी चालवण्यासाठी मंगळवारी (ता. 16) चाचणी घेण्यात आली. सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते मडगाव पावणेसहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा तास 57 मिनिटात पार केले. छत्रपती शिवाजी टर्मिनन्सवरून सुटलेली ही रेल्वे दुपारी निर्धारित वेळेपेक्षा आधीच मडगावला पोचल्याची माहिती पुढे आली आहे.
रेल्वे बोर्डाच्या सूचनानुसार कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणार्या वंदे भारत एक्सप्रेस साठी मंगळवारी पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ट्रायल रन घेण्यात आली. मुंबई ते शिर्डी ही 16 डब्यांची गाडी मंगळवारी शिर्डीला सोडली जात नाही. त्यामुळे आज ती कोकण रेल्वे मार्गावर चालवून पाहण्यात आली. सीएसएमटी येथून सकाळी 5 वाजून 53 मिनीटांनी ही गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. पुढील काही दिवसात मुंबईतून चिपळूण, रत्नागिरी तसेच गोव्याकडे वातानुकलीत आणि वेगवान वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करता येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ने मुंबई ते रत्नागिरी हे अंतर अवघ्या 4 तास 27 मिनिटात तर पनवेल ते रत्नागिरी जवळपास तीन तासात कव्हर केले. दरम्यान दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस मडगाव येथून मुंबईसाठी रवाना झाली. या चाचणीसाठी कोकण रेल्वेची मेन लाईन खुली ठेवण्यात आली होती. मुंबईत ते मडगाव हे अंतर कापण्यासाठी सध्या तेजस एक्सप्रेसला 8 तास 50 मिनिटे, सुपरफास्ट कोकणकन्या एक्सप्रेस ला 10 तास 41 मिनिटे, जनशताब्दी एक्सप्रेसला 9 तास तर मांडवी एक्सप्रेसला 12 तास लागतात. मंगळवारी याच अंतरात चाचणीसाठी धावलेल्या हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेसने अवघ्या 6 तास 57 मिनिटांमध्ये पार केले. या गाडीचत अजुन चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण होणार आहे.
दीड हजार मीटरचे अंतर 53 सेंकदात केले पार
बुलेट ट्रेनचे स्वप्न अपुरे असले तरी देशातील सर्वात अत्याधुनिक आणि सेमी स्पीड अशी वंदे भारत एक्स्प्रेसची आज चाचणी घेण्यात आली. मुंबई ते शिर्डी दरम्याद धावणार्या गाडीला साप्ताहिक सुटटी असल्यामुळे ती येथे चालवण्यात आली. रत्नागिरीत स्थानकातून ही गाडी 10.23 मिनीटांनी गोव्याकडे रवाना झाली. रत्नागिरी ते निवसर मार्गावरील पोमेंडीतील महालक्ष्मी पुल, बाणेवाडी बोगदा आणि पानवलचा मोठा पुल असे 1570 मीटरचे अंतर या गाडीने अवघ्या 53 सेंकदात पार केले, असे रत्नागिरीतील अभ्यासक उदय बोडस यांनी सांगितले.