कोकण रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 56 लाखांचा दंड वसूल 

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर तिकिटविरहित प्रवास करणार्‍यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एका महिन्यात कोकण रेल्वेच्या तिकिट तपासनीसांनी 55 लाख 99 हजार रुपये दंडापोटी वसूल केले आहेत.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूकीत सुरळीत झालेली नव्हती. दुसर्‍या लाटेमध्ये काही मोजक्याच गाड्या सोडण्यात येत होत्या. सहा महिन्यांपुर्वी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी जनरल डबे जोडले जात नव्हते. आती पुन्हा ती व्यवस्था केली जात आहे; परंतु एसटी वाहतूक अस्थिर असल्याने बहूतांश भार हा कोकण रेल्वेवर पडतो. मुंबईहून कोकणात येणारा प्रवासीवर्ग रेल्वेचा आधार घेतो. त्यामुळे सर्वच गाड्यांची आरक्षण यादी वाढते. ऑनलाईन तिकीट कन्फर्म झाले नाही, तर ते रद्द होते. अशावेळी काही प्रवासी विनातिकिट डब्या चढून प्रवास करत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन विनातिकिट प्रवास करणार्‍याविरोधात कोकण रेल्वेने कारवाईला सुरवात केली आहे. मार्च 2022 मध्ये अचानक राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत एकूण 8 हजार 633 तिकीट नसलेले अनियमित प्रवासी आढळून आले. त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ट्रेन तिकीट परीक्षकांच्या विशेष पथकाने एकूण 55 लाख 99 हजार रुपयांचा दंड वसूल केला. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.