विद्युतीकरणानंतर रोहा -रत्नागिरी पहिली विजेवरील मालगाडी धावली
रत्नागिरी:- डिझेल इंजिनच्या मदतीने धूर ओकत धावणार्या कोकण रेल्वेने आणखी एक इतिहास रचला आहे. चार दिवसांपूर्वी रोहा-रत्नागिरी २०३ कि. मी. मार्गाची सीआरएस (कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी) तपासणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर रविवारी रत्नागिरीपर्यंत प्रदूषणमुक्त आणि विजेवर धावणारी पहिली मालगाडी धावली. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धुरांच्या रेषा हवेत सोडत धावणार्या गाड्या टप्प्याटप्प्याने इतिहासजमा होणार असून, रविवारी धूरमुक्त वाहतुकीचा हा नवा अध्याय कोकण रेल्वेने सुरु आहे.
कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी दौर्यावेळी सीएसआर तपासणीनंतर आधी मालगाड्या चालवल्या जातील, असे सांगितले होते. त्या नुसार रविवारी पहिली मालगाडी विद्युत इंजिनसह धावली. सन २०१५ मध्ये कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच विद्युतीकरणाच्या कामाचा एकाच वेळी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते या कामांचा शुभारंभ झाला होता.
सुमारे ११०० कोटी रुपये खर्चून कोकण रेल्वेच्या ७४१ कि.मी.च्या संपूर्ण मार्गावर विद्युतीकरण प्रकल्प पूर्ण केला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण होऊन येत्या जूनपर्यंत वाहतूक डिझेल ऐवजी विद्युतीकरणावर सुरु होणे अपेक्षित आहे. रत्नागिरी ते रोहा या मार्गावरील ३१ डिसेंबर २०२० पर्यंत विद्युतीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते दोन महिने लांबणीवर गेले आणि २५ फेब्रुवारी २०२१ रोजी रोहा रत्नागिरी मार्गावर कोकण रेल्वेने इलेक्ट्रीक इंजिनची चाचणी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर चारच दिवसांपूर्वी ३१ मार्च रोजी या मार्गावर रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांनी सुरक्षा तपासणी केली आणि हा मार्ग विजेवर चालणार्या गाड्यांसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र कोकण रेल्वेला मिळाले.
३१ मार्चला सीएसआर तपासणीनंतर अवघ्या चारच दिवसांनी म्हणजे रविवारी (दि. ४ मार्च) रोजी सोलापूरमधील कुर्डूवाडी जंक्शनहून कोकण रेल्वे मार्गावर येणारी पहिली मालगाडी विद्युत इंजिनवर धावली. विद्युतीकरणामुळे प्रदूषण कमी करण्यासह सध्या वर्षाकाठी डिझेलवर होणारा १०० कोटी रुपयांचा खर्च वाचवण्यात कोकण रेल्वेला होणार आहे.