कोकण किनारपट्टीला ‘बिपरजॉय’ वादळाचा धोका

मान्सूनच्या आगमनावर होणार परिणाम

रत्नागिरी:- एकीकडे मान्सूनची प्रतिक्षा लागली असताना दुसरीकडे कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले आहे. पुढील 24 तासांत याच प्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असं नाव देण्यात आलं आहे. मान्सून आधी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने पावसावरही परिणाम झाला आहे.

मुंबई हवामान विभागाने या संदर्भात ट्विट करत सांगितलं की, दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर चक्रीवादळ तयार झालं आहे. हे चक्रीवादळ सरासरी समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. या चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे.

तसेच, हवामान विभागाने म्हटलं की, पुढील 48 तासांत चक्रीवादळ जवळपास उत्तरेकडे सरकण्याची आणि आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावरील दबाव क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी समुद्रात मच्छीमारांनी सावध राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीकरीता जाऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान, खाजगी हवामान अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट संस्थेच्या अहवालानुसार, भारताच्या देशाच्या पश्चिम किनारपट्टीसह उत्तरेकडे चक्रीवादळ मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. तर, चक्रीवादळ भारताच्या उत्तरेसह ओमान आणि येमेनच्या दिशेने ईशान्य दिशेने वळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

साधारणपणे 1 जूनपर्यंत मान्सून भारतात दाखल होतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा पोहोचणार आहे. मान्सून सुरू होतानाच अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाल्याने याचा परिणाम पावसावर होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झालं आहे. पुढील 24 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे.